12 December 2017

News Flash

‘दबंग २’ च्या सेटवर रमले दोघे ‘खान’!

त्या दोघांच्याही मैत्रीचा आपला एक खास अंदाज आहे. कधी ते एकमेकांकडून अभिनयाच्या टिप्स घेतात,

प्रतिनिधी, मुंबई | Updated: December 6, 2012 6:13 AM

त्या दोघांच्याही मैत्रीचा आपला एक खास अंदाज आहे. कधी ते एकमेकांकडून अभिनयाच्या टिप्स घेतात, कधी आपापल्या कलांची देवाणघेवाण करतात, त्यांच्यातल्या एखाद्याचे भांडण जरी झाले तरी दुसरा त्याची विचारपूस केल्याशिवाय रहात नाही. पण, तरीही ते आपल्या मैत्रीचा कधी गाजावाजा करत नाहीत. एक बॉलिवूडचा ‘दबंग’ सलमान खान आहे तर दुसरा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ आमिर खान. या दोन खान मित्रांनी आपली मैत्री आजवर टिकवून ठेवली आहे. या दोघांच्या मैत्रीचा अनोखा अंदाज ‘दबंग २’ च्या कलाकार आणि तंत्रज्ञांना अनुभवता आला.
‘तलाश’ प्रदर्शित झाला. तो यशस्वीही झाला. त्यामुळे एकंदरीतच यश साजरे करण्याच्या मुडमध्ये असलेल्या आमिर खानला फिल्मसिटीत सलमान चित्रिकरण करत असल्याची वार्ता लागली. सलमानला ‘दबंग २’ च्या सेटवर भेटण्याचा मोह आमिरला आवरला नाही. त्यामुळे कोणाला काहीही न सांगता आमिर सेटवर जाऊन थडकला. आमिरची ही भेट सलमानलाही आश्चर्यचकित करणारी ठरली. पण, आमिरच्या या भेटीने सलमानलाही मनापासून आनंद झाला. आपल्या चित्रिकरणातून सवड काढून सलमानने आमिरशी गप्पा मारल्या.
यावेळी अगदी ‘अंदाज अपना अपना’ या चित्रपटाच्या आठवणींपासून अनेक गोष्टींवर त्यांच्या गप्पा रंगल्या. सलमान आणि आमिरने १९९४ साली राजकुमार संतोषींच्या ‘अंदाज अपना अपना’मध्ये एकत्र काम केले होते. तेव्हापासून त्या दोघांमध्ये जो मैत्रीचा धागा जोडला गेला तो आजही कायम आहे. आजही ‘दबंग २’च्या सेटवर अचानक आलेल्या आमिरला ‘दबंग’च्या चित्रिकरणाचा काही भागही सलमानने आवर्जून दाखवला. या दोन ‘खान’ मित्रांच्या अचानक एकत्र येण्यातली मजा ‘दबंग २’च्या टीमला एक आगळावेगळा अनुभव देऊन गेली.    

First Published on December 6, 2012 6:13 am

Web Title: two khans on dabang 2 set