परीक्षेत कमी गुण मिळाल्याने तीन वर्षांपूर्वी पळून गेलेली दोन भावंडे मुंबई पोलिसांमुळे पुन्हा घरी परतली आहेत. गेली तीन वर्षे ही मुले फेरी विक्रेत्याचे काम करून उपजीविका करीत होते.
पवईस्थित हॉटेल व्यावसायिक सुदर्शन मौर्या यांची नऊ आणि ११ वर्षांचे अनुक्रमे इयत्ता चौथी आणि पाचवीत असलेली मुले २९ एप्रिल २०१३ रोजी घरातून एकाएकी गायब झाले. मौर्या यांनी पवई पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तसेच, गुन्हे शाखाही त्यांचा शोध घेत होती. पण, त्यांना काही यश येत नव्हते. बुधवार २३ मार्च रोजी गुन्हे शाखेच्या सोनसाखळी चोरी प्रतिबंधक कक्षाचे पोलीस हवालदार जाबीर पठाण यांना मौर्या यांनी कळविले की, त्यांच्या मोठय़ा मुलाने दहिसर येथून फोन करून घरी येण्याची इच्छा व्यक्त केली आहे. हवालदार पठाण आणि कर्पे यांनी तातडीने दहिसर येथे धाव घेतली आणि मुलाला ताब्यात घेतले. त्याच्याकडे लहान भावाविषयी चौकशी केली असता तो अहमदनगर जिल्ह्य़ातील कोपरगाव येथे असल्याचे सांगितले. साहाय्यक पोलीस निरीक्षक रियाझ काडी, हवालदार पठाण आणि कर्पे यांनी तिकडे धाव घेत लहान भावालाही पवईला आणले. तीन वर्षांपूर्वी परीक्षेत कमी गुण मिळाल्याने आई-वडिलांचा ओरडा खायला लागू नये म्हणून दोघांनी एप्रिल २०१३ मध्ये रेल्वेने मनमाड येथे पळ काढला. दोन्ही भावंडे प्रथम मनमाड रेल्वे स्थानकावर चणे-शेंगदाणे, पाण्याच्या बाटल्या विकण्याचे काम करीत तिथेच राहत होते. मागील एक वर्षांपासून लहान मुलगा कोपरगाव रेल्वे स्थानकाच्या परिसरात फेरीवाल्याचे काम करीत होता. पोलिसांनी तातडीने उचललेल्या पावलांमुळे मौर्या कुटुंबीयांचे दोन्ही मुले त्यांना परत मिळाली.