‘बेस्ट’ बसने दिलेल्या धडकेत दोन तरुणांचा मृत्यू झाला. कुर्ला येथील सिग्नल जवळ शनिवारी दुपारी १२ च्या सुमारास हा अपघात घडला. नेहरूनगर पोलिसांनी बसचालक जालिंदर देशमुख (४६) याला अटक केली.
बस क्रमांक ३९९ ट्रॉम्बेहून मुलुंड येथे निघाली होती. कुर्ला येथून वळण घेत असताना बसने एका मोटारसायकला धडक दिली. या अपघातात मोटारसायकलवरील कार्तिक नाईक (२५) आणि रघुवीर जडेजा (२५) हे दोन तरुण गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान या दोघांचा मृत्यू झाला. हे दोघे तरुण सायनच्या प्रतीक्षानगर येथे राहणारे होते.