आतापर्यंत दोन लाख मुंबईकरांचे अ‍ॅपद्वारे मतदान

प्रसाद रावकर, लोकसत्ता

मुंबई :  केंद्र सरकारच्या ‘स्वच्छ सर्वेक्षण-२०२०’तील मुंबईची कामगिरी नागरिक ठरवणार आहे. आतापर्यंत तब्बल दोन लाखांहून अधिक मुंबईकरांनी याकरिता मत दिले असून हा कौल गुलदस्त्यात आहे. मात्र मुंबईकरांनी दिलेल्या मतावर ‘स्वच्छ सर्वेक्षण-२०२०’मधील मुंबईचा क्रमांक अवलंबून आहे. स्वच्छ सर्वेक्षणात मुंबईला आघाडीचे स्थान मिळावे यासाठी पालिकेकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत.

‘मुंबई २४ तास’ योजना राबवून आर्थिक राजधानीला जगातील नामांकित शहराची पंक्तीत बसविण्याची तयारी सुरू आहे. अशा या शहरात या सर्वेक्षणाच्या निमित्ताने मुंबईकरांना पालिकेने केलेल्या नागरी कामांचा दर्जा ठरविता येणार आहे.  यंदा नागरिकांच्या मतांसाठी तब्बल १५०० गुण ठेवण्यात आले आहेत. शहरातील नागरिकांनी अ‍ॅपवरील मतदानासाठी १५०० पैकी ४०० गुण देण्यात येणार आहेत. तर उर्वरित ८०० गुण ‘स्वच्छ सर्वेक्षणा’चे पथक नागरिकांशी संवाद साधून देणार आहेत. यापूर्वी नागरिकांनी मतदानासाठी दाखविलेल्या निरुत्साहामुळे ‘स्वच्छ सर्वेक्षणा’च्या यादीत मुंबईचा क्रमांक घसरला होता.

‘स्वच्छ सर्वेक्षणा’चे पथक अलीकडेच मुंबईत दाखल झाले होते. मुंबईच्या विविध भागांतील स्वच्छतेची पाहणी गुप्तपणे करून निघून गेले. त्याचबरोबर स्वच्छतेविषयी मुंबईकरांचे मत जाणून घेण्यासाठी, संवाद साधण्यासाठीही केंद्राचे एक पथक गुप्तपणे येऊन गेले. त्यामुळे या पाहणीसाठीच्या ८०० गुणांपैकी किती गुण मिळणार हे गुलदस्त्यात आहे.

पालिकेने ४०० पैकी अधिकाधिक गुण मिळविण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी रेल्वे स्थानकांसह ठिकठिकाणी नागरिकांचे मत घेण्यासाठी स्टॉल्स उभारण्यात आले होते. पालिका अधिकारी-कर्मचारी नागरिकांची माहिती घेऊन स्वत:च अ‍ॅपवर मत नोंदणी करीत असल्याचा आरोप होऊ लागला. मात्र ‘स्वच्छ सर्वेक्षणा’साठी नागरिकांनी मतदान करावे यासाठी पालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांमार्फत आवाहन करण्यात येत होते, अशी सारवासारव पालिकेने केली.

आतापर्यंत २ लाख १ हजार ७२७ मुंबईकरांनी अ‍ॅपवर मत नोंदणी केली आहे. मात्र यामध्ये किती सकारात्मक आणि किती नकारात्मक मते आहेत त्यावर मिळणारे गुण अवलंबून आहेत. मुंबईला चांगला क्रमांक मिळावा यासाठी मुंबईकरांनी मोठय़ा संख्येने मतदान करावे, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.

मागील वर्षी नागरिकांनी मतदानाबाबत निरुत्साह दाखविल्याने मुंबईचा क्रमांक घसरला होता. त्यामुळे यावेळी लोकांनी मोठय़ा संख्येने मतदान करावे यासाठी पालिकेकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. चित्रपटगृहात स्वच्छतेविषयीचा माहितीपट दाखविण्यात येत आहे. ‘स्वच्छ सर्वेक्षणा’त मुंबईचा क्रमांक आघाडीवर आणण्यासाठी मुंबईकरांनी मोठय़ा संख्येने मतदान करावे.

– किरण दिघावकर, सहाय्यक आयुक्त, महापालिका