विधानभवनाच्या आवारात पोलिस उपनिरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना मारहाण करणाऱया आमदार क्षितिज ठाकूर आणि आमदार राम कदम यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला. १५ हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर या दोन्ही आमदारांना जामीन मंजूर करण्यात आला. या दोन्ही आमदारांना दर बुधवारी गुन्हे शाखेमध्ये हजेरी लावण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. ठाकूर आणि कदम या दोन्ही आमदारांची सोमवारी दुपारी आर्थर रोड कारागृहातून सुटका करण्यात आली.
विधानभवनाच्या आवारात गेल्या मंगळवारी ठाकूर आणि कदम यांच्यासह इतर आमदारांनी सूर्यवंशी यांना मारहाण केली होती. त्यानंतर विधानसभेच्या अध्यक्षांनी बहुजन विकास आघाडीचे क्षितिज ठाकूर, मनसेचे राम कदम, भारतीय जनता पक्षाचे जयकुमार रावळ, अपक्ष प्रदीप जैस्वाल आणि शिवसेनेचे राजन साळवी यांना ३१ डिसेंबर २०१३पर्यंत विधिमंडळाच्या कामकाजात सहभागी होण्यापासून निलंबित केले होते.
गेल्या गुरुवारी पोलिसांनी कदम आणि ठाकूर या दोघांना अटक केली. मुंबईतील किल्ला न्यायालयाने सुरुवातीला त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. गेल्या शुक्रवारी न्यायालयाने या दोन्ही आमदारांना न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्यांच्या वकिलांनी जामीनासाठी अर्ज दाखल केला. न्यायालयाने त्यांच्या जामीनावरील निर्णय सोमवारपर्यंत राखून ठेवला होता.