मुंबई : जोगेश्वरी पूर्व परिसरातून भुयारी गटारद्वारांच्या (मॅनहोल) लोखंडी झाकणाची चोरी करणाऱ्या दोघांना जोगेश्वरी पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या आहे. धीरज रतीलाल सिन्हा (२४) आणि अब्दुल कलाम मोहम्मद सिद्दिकी खान (३६) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

जोगेश्वरी परिसरात रात्रीच्या सुमारास गस्त घालताना पोलिसांना रस्त्याच्या कडेला सिन्हा आणि खान काही संशयास्पद हालचाली करताना दिसले. पोलीस चौकशीसाठी त्यांच्याकडे जायला निघताच त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांचा संयश बळावला. त्यांनी तत्काळ दोघांचा पाठलाग करत त्यांना अटक केली. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी भुयारी गटारद्वाराच्या चार झाकणांची चोरी केल्याचे मान्य केले. या प्रकरणी १२ ऑगस्टला महानगरपालिकेच्या जोगेश्वरी परिसरातील के-पूर्व विभागाने भुयारी गटारद्वाराची झाकणे चोरी झाल्याची तक्रार पोलिसांकडे केली होती. या प्रकरणी भुयारी गटारद्वारच्या झाकणांची चोरी करतानाचे आरोपींचे चित्रण सीसीटीव्हीमध्ये कैद झाले असून ते पोलिसांकडे असल्याची माहिती जोगेश्वरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र नेर्लेकर यांनी दिली. आरोपींविरुद्ध सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान आणि चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.