बनावट बँक खात्यांद्वारे कोटय़वधी रुपयांच्या अपहारप्रकरणी पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली. हे दोघेही कर्मचारी चित्रपट व्यावसायिक अनिल थडानी यांच्या कार्यालयातील आहे. थडानी यांचे चेकबुक चोरून त्यांनी बनावट खात्यातून साडेबारा लाख रुपये वटविण्याचा प्रयत्न केला होता.
३१ जुलै रोजी थडानी यांच्या खात्यातून ५० हजार रुपये काढण्यात आल्याचे त्यांच्या लक्षात आले. एम.जी. ट्रेडिंग कंपनीच्या नावाने असलेल्या खात्यात थडानी यांच्या कंपनीतून साडेबारा लाख रुपये वळविण्यात आले होते. मुंबई गुन्हे शाखेच्या मालमत्ता शाखेने या प्रकरणी तपास करून ओमप्रकाश पाठक (२१) आणि विश्वंभर मिश्रा यांना अटक केली. त्यांनी थडानी यांची सही असलेला धनादेश मिळवूनत्या आधारे बँकेतून कोरे धनादेश प्राप्त केले होते. ते राधेमोहन चौबे याला देऊन नंतर बनावट खात्यात साडेबारा लाख रुपयांची रक्कम वळवली होती, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे यांनी दिली. पाठक हा थडानी यांच्या कंपनीत लेखापाल होता. या प्रकरणी मालमत्ता शाखेने २० ऑक्टोबर रोजी किशोरकुमार कनोजिया याला अटक केल्यानंतर या बनावट खाते टोळीचा पदार्फाश झाला होता. या प्रकरणात आतापर्यंत ९ जणांना अटक झाली आहे.