लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सुरू केलेल्या धडाकेबाज कारवाईपाठोपाठ राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्यापुढील अडचणींमध्ये बुधवारी आणखी नवी भर पडली. सक्तवसुली संचालनालयाच्या जाळ्यात भुजबळ अडकले असून संचालनालयाने बुधवारी भुजबळ आणि अन्य काही जणांच्या विरोधात दोन आर्थिक गुन्हे सूचना अहवाल नोंदविले. पहिला गुन्हे सूचना अहवाल हा महाराष्ट्र सदन घोटाळा व कालिना येथील भूखंड वाटप प्रकरणी दाखल करण्यात आला आहे. तर दुसरा गुन्हे अहवाल नवी मुंबई येथील गृहनिर्माण प्रकल्पासंदर्भात आहे.
‘प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाऊडरिंग अ‍ॅक्ट’ अर्थात ‘आर्थिक गैरव्यवहारा’च्या तरतुदीखाली ही कारवाई केली गेली आहे.
नवी मुंबई येथील गृहनिर्माण प्रकल्पाच्या विकासकाने नोंदणीची आगाऊ रक्कम म्हणून सदनिकाधारकांकडून २०१० मध्ये दहा टक्के रक्कम घेतली होती. मात्र त्याचे बांधकाम सुरु झालेले नाही, असे सक्तवसुली संचालनालयाच्या सूत्रांनी सांगितल्याचे ‘पीटीआय’च्या बातमीत म्हटले आहे. या प्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात भुजबळ यांचा मुलगा पंकज आणि पुतण्या समीर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिक्षण संस्थेवरही छापे
भुजबळ यांच्या मालमत्तेवर छापे घालण्याचे सत्र बुधवारीही सुरू होते. दुपारी लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाच्या अधिकाऱ्यांनी वांद्रे येथील भुजबळ कुटुंबिय विश्वस्त असलेल्या मुंबई एज्युकेशन ट्रस्ट या शैक्षणिक संस्थेवर छापे घातले. या छाप्यात आक्षेपार्ह अशी कुठलीही कागदपत्रे सापडली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने छाप्यांनंतर माझ्या मालमत्तेबद्दलची आकडेवारी फुगवून प्रसिद्धीस दिली आहे. भाजपचे खासदार किरीट सोमय्या खोटेनाटे आरोप करीत आहेत. त्यांनीच दिलेली आकडेवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बहुधा प्रसिद्धीस दिलेली असावी. सर्व मालमत्तांच्या किमती काळानुरूप वाढल्या असून मी प्राप्तिकरही त्यानुसारच भरत आहे. मला राजकीयदृष्टय़ा संपविण्याचा हा पद्धतशीर प्रयत्न सुरू आहे.
– छगन भुजबळ

भुजबळ प्रकरणाची सध्या चौकशी सुरू आहे. आता काही बोललो तर चौकशीवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, असा आरोप होऊ शकतो. यामुळेच योग्य वेळेला बोलेन.
– शरद पवार,
अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस</strong>