मुंबई विमानतळावर ४ हजार ५९६ प्रवाशांची तपासणी

मुंबई : करोना विषाणूचे आणखी दोन संशयित रुग्ण राज्यात आढळले आहेत. यातील एक मुंबई आणि पुण्यातील असून त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले आहे.

बुधवापर्यंत मुंबई विमानतळावर ४ हजार ५९६ प्रवाशांचे स्क्रिनिंग करण्यात आले. विषाणूबाधित भागातून आलेले महाराष्ट्रातील २३ प्रवासी आढळले आहेत. आत्तापर्यंत १० प्रवाशांना सौम्य सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे आढळली आहेत.

मंगळवारी मुंबईत कस्तुरबा रुग्णालयात आणि पुण्यात नायडू रुग्णालयात अशा दोन संशयित रुग्णांना विलगीकरण कक्षात भरती करण्यात आले आहे.

सध्या मुंबईत ६, ३ पुण्यात तर १ जण नांदेड येथे भरती आहेत. या सर्व प्रवाशांचे नमुने पुण्याच्या एनआयव्ही येथे पाठवण्यात आले आहेत. यापैकी सहा प्रवाशांचे रक्ताचे नमुने निर्दोष आल्याचे एनआयव्हीने कळवले आहे.

उर्वरित प्रवाशांचा अहवाल गुरुवापर्यंत प्राप्त होईल. राज्यात अद्याप एकही रुग्ण आढळलेला नाही, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.