धारावीत आणखी दोघांना करोनाची लागण झाली असल्याचं निष्पन्न झालं आहे. करोनाची लागण झालेल्या महिलेच्या वडील आणि भावाला करोनाची लागण झाली असल्याचं समोर आलं आहे. यानंतर पोलिसांकडून डॉक्टर बलिगा नगर परिसर सील करण्यात आला आहे. दरम्यान परिसरात कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरु आहे. यासोबत धारावीतील करोनाबाधितांची संख्या सातवर पोहोचली आहे. यामध्ये एका मृताचाही समावेश आहे.

धारावीतील ३० वर्षीय महिलेला करोनाची लागण झाली असल्याचं वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झालं होतं. याच महिलेच्या वडिलांना आणि भावाला करोनाची लागण झाली आहे. आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळख असणाऱ्या धारावीत करोनाचे रुग्ण वाढत असल्याने राज्य सरकार आणि आरोग्य विभागाची चिंता वाढत आहे.

दरम्यान दिल्लीच्या मरकजसाठी गेलेले पाचजण धारावीत गेले होते. ते पाचही जण धारावीत राहिले होते. ज्याच्या फ्लॅटमध्ये हे लोक राहिले त्याचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. धारावीत आलेले तबलिगी जमातचे पाच लोक नंतर केरळला गेले. त्यांच्या संपर्कात आलेल्या धारावीत राहणाऱ्या ५९ वर्षीय व्यक्तीला करोनाची लागण झाली आणि त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान मुंबईत सोमवारी दिवसभरात ५७ नवे रुग्ण आढळले असून चार जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईतील करोनाबाधितांचा आकडा ४९० वर गेला आहे. त्यापैकी ३४ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला असून ५९ जण करोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. तर अजून १५० संशयित रुग्ण दाखल आहेत. पुण्यातील रुग्णांच्या संख्येतही अचानक वाढ झाली असून सोमवारी एका दिवसात ३७ नवे रुग्ण आढळले. मुंबई आणि पुण्यात दिवसेंदिवस रुग्णांचा आकडा वाढत असून वेगवेगळे परिसर प्रतिबंधित करण्यात येत आहेत.

महाराष्ट्रातील करोनाबाधितांची संख्या ८६८ झाली असून ५२ जणांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी दिवसभरात एकूण १२० रुग्ण सापडले असून सात मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबईमधील चार, वसई, नवी मुंबई आणि अंबरनाथमधील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. आतापर्यंत ५६ जणांवर उपचार करुन त्यांना घरी पाठण्यात आलेलं आहे.