प्रशासनाला लकवा लागला की काय, असे विधान राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी केल्याने त्याची राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असली तरी राष्ट्रवादीच्या दोन मागण्या मात्र मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मान्य केल्या आहेत. गेले दोन वर्षे रखडलेल्या पुणे मेट्रो प्रकल्पाबरोबरच पक्षाने मागणी केलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या धोरणाला मंत्रिमंडळाने सोमवारी मान्यता दिली.
राष्ट्रवादीने जून महिन्यात १४व्या वर्धापनदिनानिमित्त ज्येष्ठ नागरिकांची सनद जाहीर करून राज्यभर विविध कार्यक्रम केले होते. ज्येष्ठ नागरिकांचे धोरण सरकारने तयार करावे, अशी राष्ट्रवादीची मागणी होती. मंत्रिमंडळाच्या बैठकीत हे धोरण मान्य करण्यात आले.
पुण्यातील मेट्रो रेल्वे प्रकल्प मंजूर होण्यास होणाऱ्या विलंबाबद्दल काही महिन्यांपूर्वी शरद पवार यांनी जाहीरपणे तीव्र नापसंती व्यक्त केली होती. पुण्यातील मेट्रो प्रकल्प लवकर मार्गी लावण्याची राष्ट्रवादीची मागणी मान्य झाली असली तरी हा प्रकल्प मुंबईच्या धर्तीवर खासगीकरणातून होणार नाही. यासाठी दिल्लीच्या धर्तीवर पुणे महानगर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन हा प्रकल्प राबविणार आहे.
मध्यंतरी मुख्यमंत्री आणि पवार यांच्या उपस्थिथीत झालेल्या बैठकीत साखर कामगारांच्या वेतनाचा प्रश्न मार्गी लावण्यात आला. तसेच राष्ट्रवादीची सत्ता असलेल्या नवी मुंबईतील काही प्रश्न सोडविण्याचे मुख्यमंत्र्यांनी पवार यांच्या पुढाकाराने झालेल्या बैठकीत मान्य केले होते. राष्ट्रवादीच्या काही महत्त्वाच्या मागण्या मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्याबद्दल पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी समाधान व्यक्त केले.