महिला आणि सुरक्षा रक्षकांना अटक

चेंबूरमध्ये २४ तासांच्या आत दोन हत्या घडल्या. त्यापैकी एका घटनेत ज्येष्ठ नागरिकाची हत्या केली गेली. या प्रकरणी टिळकनगर पोलिसांनी कसून केलेल्या चौकशीनंतर वृद्धाच्या पत्नीला अटक केली.

रविवारी दुपारी चेंबूरच्या मेनन नगरात राहाणारे छोटेलाल मौर्य (७५) राहत्या घरी मृतावस्थेत आढळले. डोक्यात अवजड वस्तूचे प्रहार करून त्यांची हत्या केली गेली. पोलिसांनी संशयित म्हणून छोटेलाल यांच्या पत्नीकडे चौकशी सुरू केली. घरासमोर कांदे-बटाटे विक्रीचा व्यवसाय करणारे छोटेलाल घरखर्चाला पैसे देत नव्हते. शिवाय संशयी, रागीट स्वभावामुळे ते नेहमी कुटुंबासोबत वाद घालत असत, अशी माहिती पोलिसांना मिळाली.

दुसरी घटना सोमवारी सकाळी सातच्या सुमारास अमर महल उड्डाणपुलाखाली घडली.या पुलाच्या डागडुजीचे काम गेल्या तीन महिन्यांपासून सुरू आहे. त्यासाठी लोखंडी खांब आणि अन्य आवश्यक त्या वस्तूंचा साठा पुलाखाली आहे. या वस्तू चोरून त्या भंगारात विकण्याचे सत्र गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. अमली पदार्थाची नशा करणाऱ्यांपासून लहान मुले, तरुण सारेच येथील लोखंडी शिगा, खांब चोरून भंगारात विकण्यासाठी धडपड करतात. सोमवारी सकाळी असाच प्रयत्न करणाऱ्या विलास वनपट्टे आणि वेलजी मारू या तरुणांना चार सुरक्षारक्षकांनी बेदम मारहाण केली. त्यात मारू याचा मृत्यू झाला. या प्रकरणी टिळकनगर पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून चार सुरक्षारक्षकांना अटक केली.