संतोष प्रधान

लोकसभेबरोबरच पार पडलेल्या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांनंतर दोन राज्यांच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा प्रवास चक्क तुरुंगातून झाला आहे. यातील एक मुख्यमंत्री तर भ्रष्टाचारविरोधी कायद्यान्वये दोषी ठरले होते आणि एक वर्षांची शिक्षाही भोगून आले आहेत. आता त्यांना पद भूषविता येते का, हा कायदेशीर मुद्दा उपस्थित झाला आहे.

आंध्र प्रदेशचे नियोजित मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांना बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी अटक झाली होती आणि त्यांना तब्बल १६ महिने तुरुंगात काढावे लागले. यानंतर त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली. सिक्कीमचे नवे मुख्यमंत्री प्रेमसिंग तमंग ऊर्फ पी एस गोलय हे तर एक वर्षांची शिक्षा भोगून आले आहेत. तमंग हे पशुसंवर्धनमंत्री होते. तेव्हा त्यांनी गैरव्यवहार केल्याचा आरोप होता. या गैरव्यवहाराच्या आरोपात तमंग ऊर्फ गोलय हे दोषी ठरले.  कनिष्ठ न्यायालयाने त्यांना एक वर्षांची शिक्षा ठोठावली होती. या निकालाच्या विरोधात तमंग हे उच्च न्यायालयात गेले होते. उच्च न्यायालयाने त्यांची शिक्षा कायम केली आणि तमंग यांना एक वर्ष तुरुंगात काढावे लागले. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात एक वर्षांची शिक्षा भोगून ते सुटले होते.

मुख्यमंत्रिपदाबाबत प्रश्नचिन्ह

दोन वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक काळ शिक्षा झाल्यास पदावर राहता येत नाही. कोणतेही पद भूषविण्यास आपोआप अपात्र ठरतो. मागे लालूप्रसाद यादव हे खासदार म्हणून अपात्र ठरले होते. शिक्षेचा कालावधी पूर्ण झाल्यावर सहा वर्षे कोणतीही निवडणूक लढविता येत नाही, अशीही लोकप्रतिनिधी कायद्यात तरतूद आहे. लोकप्रतिनिधी कायद्यातील ८व्या कलमानुसार भ्रष्टाचारविरोधी कायद्यानुसार दोषी ठरल्यास शिक्षेचा कालावधी पूर्ण झाल्यावर त्या तारखेपासून पुढील सहा वर्षे निवडणूक लढविता येत नाही. कायद्यातील या कलमानुसारच तमंग यांना विधानसभेची निवडणूक लढविता आली नव्हती. ३२ सदस्यीय सिक्कीम विधानसभेत तमंग यांच्या सिक्कीम क्रांतीकारी मोर्चा पक्षाला १७, तर देशात सर्वाधिक काळ मुख्यमंत्रिपद भूषविण्याचा विक्रम केलेले पवनकुमार चामलिंग यांच्या सिक्कीम डेमॉक्रेटिक पक्षाला १५ जागा मिळाल्या. निसटते बहुमत मिळाल्यावर मुख्यमंत्रिपदावर तमंग यांनी दावा केला. तमंग यांच्या शिक्षेचा कालावधी २०१८ मध्ये संपुष्टात आला आहे. यामुळे २०२४ पर्यंत ते कोणतीही निवडणूक अथवा पद भूषविण्यास पात्र ठरणार नाहीत, असा युक्तिवाद विरोधी पक्षाने केला होता. पण राज्यपालांनी तमंग यांना मुख्यमंत्रिपदासाठी शपथ घेण्यास पाचारण केले. आता तमंग यांच्या मुख्यमंत्रिपदाचा मुद्दा न्यायालयात जाईल, अशी चिन्हे आहेत.

जगनमोहन यांनी सत्तेत कोणतेही पद भूषविलेले नाही. माजी मुख्यमंत्री वाय एस राजशेखर रेड्डी यांचे पुत्र असलेल्या जगनमोहन यांनी वडील मुख्यमंत्रिपदी असताना सत्तेचा दुरुपयोग करीत काही मोठय़ा कंपन्यांचा फायदा करून दिला होता व त्या बदल्यात या कंपन्यांनी जगनच्या व्यवसायाला मदत केली होती, असा त्यांच्यावर आरोप आहे. वडिलांच्या सत्तेचा दुरुपयोग करीत जगन यांनी बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. यातून त्यांना अटक झाली होती. ही कारवाई राजकीय हेतून प्रेरित असल्याचा आरोप तेव्हा जगनने केला होता. आता मात्र जगन यांच्याकडे मुख्यमंत्रिपद आले आहे.