आजच्या प्रगल्भ, समर्थ, कल्पक, निर्णयक्षम आणि नवनवीन स्वप्ने पाहण्याची दृष्टी असलेल्या मराठी स्त्रीच्या पंखांना बळ देण्यासाठी आणि ‘तू पुढचं पाऊल उचल, आम्ही तुझ्या पाठिशी आहोत’ हा विश्वास देण्यासाठी ‘स्टार प्रवाह’ वाहिनी आणि ‘न्यू फेअर अ‍ॅण्ड लव्हली’ने ‘लोकसत्ता’च्या सहयोगाने महिलांसाठी ‘स्वप्नांना पंख नवे’ हा उपक्रम आयोजित केला. त्यानिमित्ताने स्वप्नपूर्तीचे काही सुंदर क्षण ‘स्टार प्रवाह’ वाहिनी प्रेक्षकांसाठी घेऊन आली आहे.
या उपक्रमात सहभागी होण्यासाठी मुंबई, पुणे, कोल्हापूर आणि नाशिक या शहरांमधून ५० हजारांहून अधिक महिलांनी ब्युटी अ‍ॅण्ड स्कीन केअर, अभिनय, फॅशन डिझायनिंग, फूड अ‍ॅण्ड केटरिंग, लघुउद्योग या क्षेत्रांत मार्गदर्शन मिळवण्यासाठी ‘मिस्ड कॉल’ दिले. प्राथमिक फेरीनंतर या चार शहरांतून पाच क्षेत्रांमधून प्रत्येकी एका महिलेची निवड करण्यात आली.
या एकूण २० महिलांना मुंबईत अभिनयासाठी मृणाल कुलकर्णी, फॅशन डिझायनिंगसाठी पूर्णिमा ओक, लघुउद्योगांसाठी योगिता कारले, फूड अ‍ॅण्ड केटरिंगसाठी आदिती लिमये-कामत, तर ब्युटी अ‍ॅण्ड स्कीन केअरसाठी भरत आणि डोरिस गोडांबे या नामवंतांकडून मार्गदर्शन मिळाले. या नामवंतांनी प्रत्येक क्षेत्रातून एका विजेत्या महिलेची देखील निवड केली.
विजेत्या महिलेला ‘स्टार प्रवाह’ वाहिनीतर्फे तिने निवडलेल्या क्षेत्रात शिक्षण घेण्यासाठी त्या त्या क्षेत्रातील महाविद्यालय, संस्थेमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी सहाय्य तसेच शिष्यवृत्ती मिळणार आहे. स्वप्ने सत्यात साकार होण्याचा हा प्रवास सोमवार, १९ मे ते शनिवार, २४ मेपर्यंत रोज सायंकाळी सहा वाजता ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर पाहायला मिळणार आहे.