‘एमपीएससी’चे पेपर देणाऱ्या दोन अधिकाऱ्यांना अटक

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उमेदवाराऐवजी पोलीस सेवेतील अधिकारी परीक्षा देत असल्याचे काही महिन्यांपूर्वी यवतमाळ, लातूर भागात उघड होऊनही अशा तोतया परीक्षार्थीची साखळी अद्याप राज्यभरात कार्यरत असल्याचे समोर आले आहे. मुंबईत देखील हा प्रकार होत असून विक्रीकर निरीक्षक म्हणून सेवेत असतानाच या परीक्षांना तोतया विद्यार्थी बनून वरकमाई करणाऱ्या दोघा अधिकाऱ्यांना भायखळा येथे पकडण्यात आले आहे.

संदीप भुसारी आणि सचिन नराले अशी अटक करण्यात आलेल्या विक्रीकर अधिकाऱ्यांची नावे असून ते कोल्हापूरमधील आहेत. सध्या विविध स्पर्धा परीक्षांसाठी नोंद केलेल्या उमेदवारांऐवजी भलत्याच परीक्षार्थीची मोठी साखळी राज्यभर कार्यरत आहे. अधिक गुण मिळविण्यासाठी उमेदवार प्रचंड पैसा ओतून प्रशासनातील अधिकाऱ्यांनाच परीक्षेला आपल्या नावावर बसवित आहेत. जून २०१६ मध्ये यवतमाळ येथील दोन सहायक पोलीस अधिकारी तोतया म्हणून परीक्षा देताना पकडण्यात आले होते. आयोगाकडून रविवारी (३१ डिसेंबर) कर सहायक पदासाठी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेला नोंदणी केलेल्या उमेदवारांऐवजी बसलेल्या दोन तोतया परीक्षार्थीना भायखळा येथील परीक्षा केंद्रावर अटक करण्यात आले. संदीप भुसारी आणि सचिन नराले हे परीक्षा देणारे खोटे उमेदवार प्रत्यक्षात गेल्या तीन वर्षांपासून विक्रीकर निरीक्षक म्हणून सेवेत आहेत. २०१३ मध्ये आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन विक्रीकर निरीक्षक म्हणून ते रुजू झाले होते. या दोघांवर बनावट कागदपत्रे तयार करणे, फसवणूक करणे, कट रचणे असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दोघेही तोतया विद्यार्थी बनून परीक्षा देणार असल्याची माहिती भायखळा पोलिसांना मिळाली होती.