नवी मुंबईतील सागर विहार भागात असलेल्या पादचारी पुलाचा काही भाग कोसळला. या घटनेत दोन जण जखमी झाले आहेत. या जखमींवर रूग्णालयात उपचार सुरु आहेत अशी माहिती मिळते आहे. मागील महिन्यातल्या १४ तारखेलाच मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस भागातला पूल कोसळून सहा जण ठार झाल्याची घटना घडली. या घटनेला महिनाही पूर्ण होत नाही तोच आता नवी मुंबईतला सागर विहार भागातला पादचारी पूल कोसळून दोन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.

१४ मार्चला मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील हिमालय पूल कोसळून सहाजण ठार झाले. तर ३० पेक्षा जास्त लोक जखमी झाले होते. याप्रकरणी त्याच रात्री आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुंबई महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी महापालिकेमार्फत या दुर्घटनेची तपासणी करून अहवाल सादर केला. या पुलाचे ऑडिट करणाऱ्या डी. एन. देसाई असोसिएटेड इंजिनिअरींग कन्सल्टंट अँड अॅनालिस्ट प्रा. लि. आणि पुलाची दुरूस्ती करणाऱ्या आर. पी. एस इंफ्राप्रोजेक्ट प्रा. लि. कंपनीवर ठपका ठेवण्यात आला. या घटनेला महिना उलटण्याच्या आत नवी मुंबईतल्या सागर विहार भागात पुलाचा काही भाग कोसळून दोन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.