मध्य रेल्वेचे अपघाताचे गन्तव्य स्थान बनलेल्या कोपर ते दिवा रेल्वे स्थानकाच्या दरम्यान मंगळवारी दिवसभरात दोन जण मरण पावले. एक पादचारी रेल्वे रुळ ओलांडत असताना लोकलने दिलेल्या धडकेत मरण पावला. त्याच वेळी एक प्रवासी लोकलमधून पडून मरण पावला, तर तिसऱ्या घटनेत एक प्रवासी दरवाजातून पडून गंभीर जखमी झाला. त्याच्यावर डोंबिवलीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या तिन्ही अपघातांची नोंद डोंबिवली रेल्वे पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. मंगळवारी सकाळी नितीन जाधव हे मुंबईच्या दिशेने लोकलमधून प्रवास करीत होते. गर्दीमुळे डब्यात घुसता न आल्याने ते दरवाजातून पडून मरण पावले. चंद्रकांत रामचंद्र म्हात्रे हे रेल्वे मार्ग ओलांडत असताना लोकलने दिलेल्या धडकेत मरण पावले. या दोन्ही अपघातांच्या घटना कोपर ते दिवा रेल्वे स्थानकांच्या दरम्यान घडल्या. याच दिवशी दीनबंधू शर्मा हे लोकलमधून ठाण्याच्या दिशेने प्रवास करीत होते. गर्दीमुळे डब्यात शिरता न आल्याने ते लोकलमधून पडून गंभीर जखमी झाले. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.