मुंबई : आर्थिक घोटाळ्यांच्या गर्तेत सापडलेल्या पंजाब-महाराष्ट्र सहकारी बँकेमध्ये आयुष्याची मिळकत विनाकारण अडकल्याने हजारो खातेदार हवालदिल झाले आहेत. गेल्या २० दिवसांपासूनच्या तणावाशी सामना करणाऱ्या दोन खातेदारांचा चोवीस तासांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

संजय गुलाटी (५१) आणि फत्तेमुल पंजाबी (५९) अशी या खातेदारांची नावे आहेत. नोकरी गमावलेल्या गुलाटी यांचे आर्थिक गाडे बँकेत ठेवलेल्या रकमेच्या व्याजावर सुरू होते. तर व्यावसायिक असलेले फत्तेमुल पंजाबी मोठी रक्कम बँकेत अडकल्यामुळे प्रचंड चिंतेत होते. ओशिवरा येथे राहणाऱ्या गुलाटी यांच्या खात्यात जवळपास ९० लाख तर मुलुंडमधील फत्तेमुल पंजाबी यांच्या खात्यात १० लाखांहून अधिक रक्कम जमा होती.

पीएमसी बँकेवर आलेल्या र्निबधांनंतर पैसे परत मिळण्याची शाश्वती वाटत नसल्याने ते दोघेही मानसिक तणावात असल्याची माहिती त्यांच्या परिचितांनी दिली.

संजय गुलाटी यांना काही महिन्यांपूर्वी आर्थिक डबघाईला आलेल्या जेट एअरवेजमधील नोकरी एप्रिलमध्ये गमवावी लागली होती. त्यानंतर काहीच दिवसांत ‘पंजाब महाराष्ट्र सहकारी बँके’तील (पीएमसी) आयुष्यभराची हक्काची मिळकतदेखील दैनंदिन खर्चासाठी काढण्यावर निर्बंध आले. त्यामुळे गुलाटी यांची आर्थिक कोंडी झाली होती.

मुलाच्या उपचारांसाठीही हक्काचे पैसे काढता न आल्याचा ताण गुलाटी यांना असह्य़ झाला आणि त्यातच त्यांचे निधन झाले. या मृत्यूस पीएमसी बँक जबाबदार आहे, असा आरोप गुलाटी यांच्या नातेवाईकांनी के ला आहे.

मुलुंड येथील फत्तेमुल पंजाबी यांचा स्वत:चा व्यवसाय होता. पीएमसीच्या प्रकरणानंतर त्यांनी आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी आगामी निवडणुकीत ‘मतदान करू नका’ असे लिहून निषेध व्यक्त केला होता. गेले काही दिवस कौटुंबिक अडचणी आणि पीएमसीत अडकलेल्या रकमेमुळे ते सतत चिंतेत असायचे, असे फत्तेमुल यांचे परिचित गुरजीत यांनी सांगितले.

पीएमसी खातेदारांच्या हक्कांसाठी लढणारे पीएमसी डिपॉझिटर्स फोरमचे अध्यक्ष विश्वास उटगी यांनी या प्रकाराबाबत खंत व्यक्त केली. पीएमसी बँक प्रकरणातून झालेले हे दोन मृत्यू सर्वासाठीच धक्कादायक बाब आहे. सामान्यांचे बळी जाऊ  लागले तरी अजून सरकारला जाग येत नाही. खातेधारक आणि विविध संस्थांचे लाखो-करोडो रुपये अडकल्याने लोक चिंतेत आहेत. अनेकांना रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. अजून किती बळी जाण्याची सरकार वाट पाहणार आहे, असा सवाल उटगी यांनी के ला आहे. खातेधारकांनी खचून न जाता लढा द्यायला हवा, असे आवाहनही त्यांनी के ले.

पत्रकारांच्या वर्तनाबाबत संताप

मुलुंड येथे झालेल्या निदर्शनात फत्तेमुल पंजाबी सक्रिय सहभागी होते. त्यामुळे त्यांच्या निधनाची वार्ता समजताच पीएमसी बँके तील खातेदारांनी आणि आंदोलकांनी मुलुंड येथील त्यांच्या निवासस्थानी धाव घेतली. या वेळी अनेक पत्रकारही उपस्थित होते. परंतु स्थळकाळाचे भान न राखता पत्रकारांनी फत्तेमुल यांच्या घरात शिरकाव करून प्रश्नांचा भडिमार केल्यामुळे नाराजी व्यक्त करत फत्तेमुल यांच्या मुलीने पत्रकारांना बाहेरचा रस्ता दाखवला. वैतागलेल्या त्यांच्या मुलीने ‘आमचा पीएमसी बँके शी काहीही संबंध नाही’ असे सांगितले. वास्तवात फत्तेमुल यांचे पीएमसी बँके त खाते आहे; परंतु पत्रकारांच्या अतिउत्साहामुळे त्यांच्या मुलीचा राग अनावर झाला.

खातेदारांना न्याय देण्याची शिवसेनेची मागणी

पीएमसी बँके संदर्भात शिवसेना खासदारांच्या शिष्टमंडळाने मंगळवारी रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास  यांची भेट घेतली. या वेळी १८ लाख खातेदारांना लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी दास यांना निवेदन देण्यात आले. याशिवाय पीएमसी बँक एखाद्या राष्ट्रीयीकृत बँकेत किं वा मोठय़ा खासगी बँके त विलीन करून खातेदारांच्या ठेवी सुरक्षित कराव्यात, लागू केलेल्या र्निबधांवर विचार व्हावा तसेच ठेवीदारांच्या विम्याची रक्कम १ लाखावरून ५ लाख करावी अशा विविध मुद्दय़ांवर चर्चा करण्यात आली.

शक्तिकांत दास यांच्यासोबत झालेल्या या चर्चेत केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अरविंद सावंत, खा. गजानन कीर्तिकर, खा. राहुल शेवाळे आणि शिवसेनेचे सचिव खा. अनिल देसाई आदी सहभागी झाले होते. शिवसेनेकडून करण्यात आलेल्या सूचनांचे स्वागत करत योग्य निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दास यांनी दिले.

झाले काय? पीएमसी बँके च्या खातेदारांचे आंदोलन सुरू आहे. पैसे अडकल्यामुळे अनेक जण हताश झाले आहेत. सोमवारी किल्ला कोर्ट येथे झालेल्या निदर्शनांनंतर ओशिवरा येथे राहणारे संजय गुलाटी घरी परतले. घरी आल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि  त्यांची प्राणज्योत मालवली. मुलुंड येथील फत्तेमुल पंजाबी (५९) यांचा मंगळवारी राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

खातेदार डॉक्टरची आत्महत्या वर्सोवा येथे डॉ. योगिता बिजलानी यांनी मंगळवारी संध्याकाळी औषधांचे अतिरिक्त सेवन करून आत्महत्या केली. डॉ. बिजलानी यांचे पीएमसी बँकेत खाते असून त्यामध्ये एक कोटीहून अधिक रक्कम असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र या कारणामुळेच त्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलले का, याबाबत तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. बिजलानी काही दिवसांपूर्वी अमेरिकेतून मुंबईत माहेरी आल्या होत्या. त्यांनी अमेरिकेतही आत्महत्येचा प्रयत्न केला होता, असे त्यांच्या कुटुंबियांनी पोलिसांना सांगितले.