News Flash

दोन पोलीस कर्मचाऱ्यांचे करोनामुळे निधन

काही महिन्यांपूर्वीच त्यांची पोलीस हवालदार पदावरून पोलीस उपनिरीक्षकपदी बढती झाली होती.

(संग्रहित छायाचित्र)

मुंबई :  कांदिवली पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक संभाजी नागरे (५४) यांचे शनिवारी सायंकाळी, तर  दहिसर पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार म्हणून कार्यरत असलेले संदीप तावडे (४९) यांचे शुक्रवारी रात्री करोनाने निधन झाले. पश्चिाम उपनगरातील सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचार सुरू असताना या दोघांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने मुंबई पोलीस दलातील करोनाने आतापर्यंत मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या ११२ वर पोहचली आहे. तर गेल्या महिन्यात १ एप्रिलपासून आतापर्यंत १३ पोलीस कर्मचाऱ्यांचे करोनाने निधन झाले आहे.

नागरे हे कांदिवली पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते. काही महिन्यांपूर्वीच त्यांची पोलीस हवालदार पदावरून पोलीस उपनिरीक्षकपदी बढती झाली होती. १६ एप्रिलला त्यांचा करोना चाचणी अहवाल आला होता. त्यामध्ये बाधित असल्याचे समोर येताच १७ एप्रिलला त्यांना सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या शरीरातील प्राणवायू पातळी कमी झाल्याने चार दिवसांपूर्वी त्यांना व्हेंटीलिटरवर ठेवण्यात आले होते. मात्र उपचारांदरम्यान शनिवारी त्यांचे निधन झाले. ते मुळचे सातारा येथील पाटणचे रहिवासी होते.

तर तावडे हे दहिसर पोलीस ठाण्यात न्यायालयीन कामकाज पाहत असत. गेल्या महिन्यात त्यांचा करोना चाचणी अहवाल बाधित आल्यानंतर त्यांना २१ एप्रिलला दहिसर येथील जम्बो कोविड सेंटरमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. उपचारांदरम्यान त्यांची तब्येत खालावल्याने त्यांना २४ एप्रिलला सेव्हन हिल्स रुग्णालयात अतिदक्षता कक्षात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या आरोग्यात सुधारणा झाल्याने २६ एप्रिलला त्यांना सेव्हन हिल्स रुग्णालयातील जनरल वॉर्डमध्ये हलविण्यात आले होते. मात्र चार-पाच दिवसांपूर्वी त्यांची तब्येत पुन्हा खालावली. तसेच प्राणवायू पातळीत सुधारणा होत नव्हती. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना उपचारांसाठी पुन्हा अतिदक्षता कक्षात दाखल केले. तेथे उपचारांदरम्यान शुक्रवारी रात्री ११.४५ च्या सुमारास त्यांचे निधन झाले, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

दरम्यान करोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून मुंबईत पोलीस दलातील ११२ कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ८,७०० कर्मचाऱ्यांना करोनाची बाधा झाली आहे. तर १ एप्रिल २०२१ पासून मुंबई पोलीस दलातील १,०३४ कर्मचाऱ्यांना करोनाची बाधा झाली. त्यातील ३८२ कर्मचाऱ्यांवर सध्या उपचार सुरू आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 9, 2021 1:17 am

Web Title: two policemen die due to corona virus infection akp 94
Next Stories
1 पालिकेच्या प्रत्येक विभागात ‘ड्राईव्ह इन’ लसीकरण केंद्र
2 राजावाडी रुग्णालयाच्या सुरक्षेचा आढावा
3 करोनाविरोधातील राज्याच्या लढ्याचे पंतप्रधानांकडून कौतुक
Just Now!
X