अनेक गुन्ह्य़ांमध्ये आरोपी आणि डोक्यावर १.२५ लाख रुपयांचे इनाम असलेला गुंड संदीप गाडोली रविवारी चकमकीत ठार झाला. गुरगाव गुन्हे शाखेच्या पोलिसांसोबत मुंबईतील एका हॉटेलमध्ये ही चकमक झाली. या चकमकीत दोन पोलीसही जखमी झाले.
दिल्ली परिसरात गेल्या काही वर्षांत घडलेल्या खुनासह तीसहून अधिक गुन्ह्य़ांमध्ये सहभागी असलेला गुंड संदीप गाडोली अंधेरी पूर्व येथील एअरपोर्ट मेट्रो हॉटेलमध्ये राहत असल्याची माहिती गुरगाव शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली.
त्यानंतर रविवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी हॉटेलमधील त्यांच्या खोलीत जाण्याचा प्रयत्न केला.
त्या वेळी गाडोलीकडून पोलिसांवर गोळ्या झाडण्यात आल्या. त्याला प्रत्युत्तर देताना गुरगाव पोलिसांनी केलेल्या गोळीबारात गाडोली जखमी झाल्याची माहिती पोलीस उपायुक्त विनायक देशमुख यांनी दिली. गाडोलीला रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. दुपारी एक वाजता त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.

गाडोलीविरोधात ३६ गुन्हे
संदीप गाडोली दिल्ली व परिसरात ३६ गंभीर गुन्हे दाखल आहेत. गुरगाव पोलीस त्याच्या मागावर होते.