मुंबई : केंद्र सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या स्वच्छ शाळा स्पर्धेत राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवडण्यात आलेल्या देशातील  ५२  शाळांमध्ये  राज्यातील  दोन शाळांचा समावेश झाला आहे. लातूर जिल्ह्य़ातील सामाजिक न्याय विभागाच्या या दोन शाळा आहेत, अशी माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी दिली.

येत्या १८ सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रांत या शाळांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

शालेय जीवनातच विद्यार्थ्यांंमध्ये  स्वच्छतेची जागृती करण्यासाठी केंद्र सरकारने सप्टेंबर २०१४  पासून स्वच्छ भारत स्वच्छ विद्यालय अभियान हाती घेतले आहे.

या अभियानात शाळांनी राबवलेले स्वच्छतेचे उपक्रम आणि विद्यार्थ्यांमध्ये केलेल्या जागृतीची स्वतंत्र पथकामार्फत तपासणी करून पुरस्कारासाठी निवड केली जाते. २०१७—१८ या  वर्षांतील पुरस्कारासाठी देशभरातील हजारो शाळांनी सहभाग घेतला होता.

स्पर्धेत देशात अव्वल आलेल्या नऊ जिल्ह्यंचीही पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असून त्यात लातूर जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर  आहे. या  जिल्ह्य़ातील निलंगा तालुिक्यातील जाऊ आणि रेणापूर तालुक्यातील बावची या दोन ठिकाणच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या दोन मुलींच्या शाळांना हा पुरस्कार मिळाला असे बडोले यांनी सांगितले. त्याबद्दल त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांचे असल्याची माहिती बडोले यांनी दिली.

२० हजार शाळांचा सहभाग

पुरस्कारासाठी राज्यातील १ लाख ६० हजार १४५ शाळांपैकी २७  हजार १७९ शाळांनी नोंदणी केली होती. २०  हजार ६०२  शाळांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला होता. स्पर्धेत देशभरातील ७२९  शाळा पात्र ठरल्या तर तपासणीनंतर ५२ शाळांची पारितोषिकासाठी निवड करणत आली.