लोकसभा निवडणुकीतील विजयाचा आनंद एकमेकांना पेढा भरवून साजरा करून तासभरही उलटत नाही तोच ठाणे महापालिकेतील शिवसेनेचे दोन नगरसेवक सर्वसाधारण सभागृहातच एकमेकांची यथेच्छ उणीदुणी काढत  मंगळवारी हमरीतुमरीवर उतरले.
सभा संपताच एकमेकांविरोधातील शेरेबाजीमुळे सभागृह नेते नरेश म्हस्के आणि वागळे इस्टेट भागातील शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक संजय मोरे यांच्यात सर्वासमक्षच जुंपली आणि दोघेही एकमेकांच्या अंगावर धावून गेले. त्यांनतर ‘बघून घेईन.. हात तरी लावून बघ कापूनच टाकीन’ अशा शब्दांचा मारा एकमेकांवर केल्याने शिवसेनेतील धुसफूस चव्हाटय़ावर आली आहे.
ठाणे महापालिकेत सत्तेच्या वाटपावरून गेल्या काही महिन्यांपासून शिवसेनेत धुसफूस सुरू आहे. निवडणुका होऊन दोन वर्षे झाली तरी प्रभाग समित्यांची स्थापना होत नसल्याने शिवसेनेतील मोठा गट नाराजही आहे. संजय मोरे त्याबाबत आग्रही होते. निवडणुका संपताच या समित्यांच्या स्थापनेसाठीचे पत्र त्यांनी महापौर हरिश्चंद्र पाटील यांना दिले होते. मात्र, संख्याबळाचा वाद न्यायालयीन प्रक्रियेत असल्याने हा तिढा सुटत नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे होते.
मंगळवारी सर्वसाधारण सभेत मोरे यांनी पुन्हा हा मुद्दा मांडला मात्र महापौरांनी त्यांना दाद दिली नाही. त्यानंतर विशेष सभेतही मोरे हा मुद्दा पुढे रेटण्याच्या प्रयत्नात होते. मात्र, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांना विरोध केला तेव्हा मोरे यांच्या मदतीसाठी शिवसेनेतून कुणीच पुढे आले नाही. महापौरांनीही घाईघाईत सभा आटोपती घेतल्यामुळे संतापलेल्या मोरे यांनी सभा संपताच सभागृह नेते नरेश म्हस्के यांच्या दिशेने धाव घेत ‘तुला बघून घेतो’ असा आवाज दिला. या प्रकारामुळे सभागृह अचंबित झाले. काहींनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला तरी मोरे यांची दमबाजी सुरूच होती. त्यामुळे संतापलेले म्हस्केही मोरे यांच्या अंगावर धावून गेले. तेव्हा काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी या दोघांना सोडविल्याने पुढचा प्रसंग टळला.
शिंदे यांनी समज दिली
पक्षाच्या दोन ज्येष्ठ नगरसेवकांमध्ये झालेल्या हमरीतुमरीची माहिती कळताच आमदार एकनाथ िशदे यांनी महापालिका मुख्यालयात येऊन आयुक्त असीम गुप्ता यांची भेट घेत त्यांच्यासोबत प्रभाग समित्यांच्या स्थापनेची चर्चा केली. त्यानंतर म्हस्के आणि मोरे यांना बोलावून घेत पक्षाच्या इतर ज्येष्ठ नगरसेवकांसमोर समज दिली.