निधी कामदार यांच्यापोठापाठ कौस्तुभ धवसे हे मुख्यमंत्री कार्यालयातील दुसरे अधिकारी वादात अडकले असून, विरोधकांनी या दोन्ही अधिकाऱ्यांना लक्ष्य केले आहे.

कामदार आणि धवसे हे दोन्ही खासगी क्षेत्रातील असून, दोघेही मुख्यमंत्री कार्यालयात विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून काम बघतात. कामदार यांच्याकडे समाज माध्यमे तर धोवसे यांच्याकडे माहिती तंत्रज्ञान आणि उद्योग क्षेत्राची जबाबदारी आहे. अलीकडेच राज्यातील काही तरुणांना समाज माध्यमांवर भडक प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल पोलिसांकडून नोटिसा पाठविण्यात आल्या होत्या. २० ते २५ तरुणांची मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाच्या सायबर विभागाकडून चौकशी करण्यात आली होती. या तरुणांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन त्यांच्या कानावर ही बाब घातल्यावर पवारांनी त्यात लक्ष घातले होते.

मुख्यमंत्री कार्यालयातील विशेष कार्यकारी अधिकारी कामदार यांच्या इशाऱ्यावरून ही कारवाई झाल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला होता. या संदर्भात निधी कामदार यांच्यावर आरोप झाला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र या आरोपांचा इन्कार केला होता. जातीय तेढ निर्माण होईल अशा पद्धतीने विखारी लिखाण करणाऱ्या ११ तरुणांना नोटिसा बजाविण्यात आल्या होत्या, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले होते. पण ३० ते ३५ तरुणांना केवळ भाजप सरकारच्या धोरणाच्या विरोधात समाज माध्यमांवर लिखाण केल्याबद्दल नोटिसा बजाविण्यात आल्या होत्या. तसेच चौकशीला पाचारण करून दोन-दोन दिवस पाच-सहा तास ताटकळत ठेवून या युवकांचा मानसिक छळ करण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या समाज माध्यम विभागाचे रविकांत वरपे यांनी केला. समाज माध्यमांमध्ये लिखाण करणाऱ्या युवकांच्या विरोधात करण्यात आलेल्या कारवाईचा विषय विधिमंडळाच्या आगामी हिवाळी अधिवेशनात राष्ट्रवादीच्या वतीने उपस्थित करण्यात येणार आहे. तसेच या तरुणांना कायदेशीर मदत करण्याची घोषणा शरद पवार यांनी केली आहे.

शेतकरी कर्जमाफी योजनेत झालेल्या गोंधळाबद्दल मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात अन्य विशेष कार्यकारी अधिकारी कौस्तुभ धवसे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी आरोप केले आहेत. हे धवसे कोण, असा सवालच राष्ट्रवादीचे प्रवक्ते नबाब मलिक यांनी करून ते दलाली करीत असल्याचा आरोप केला आहे.