माहीम येथे सिग्नल यंत्रणेत झालेल्या बिघाडप्रकरणी सिग्नल विभागाच्या दोघांना निलंबित करण्यात आले आहे. सोमवारी पहाटे सिग्नल यंत्रणेत झालेल्या बिघाडामुळे छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे जाणारी हार्बर मार्गावरील गाडी माहीमच्या रेल्वे यार्डात काही अंतर गेली होती.
पश्चिम रेल्वेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, माहीम येथील सिग्नलची देखभाल करणारा कर्मचारी चक्रवर्ती याला तसेच सिग्नल इन्स्ट्रक्टर या दोघांची चौकशी करून त्यांना बुधवारी निलंबित करण्यात आले आहे. सोमवारी पहाटे ४.४५ वाजण्याच्या सुमारास सिग्नल मिळाल्यामुळे वेगात असलेली उपनगरी गाडी माहीम स्थानकाकडे जाण्याऐवजी यार्डामध्ये गेली होती. या प्रकरणाची चौकशी रेल्वेच्या विभागीय सिग्नल आणि दूरसंचार विभागाने सुरू केली होती. रविवारी रात्री या सिग्नल्सच्या तारांची चोरी झाली असण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून तेथे रेल्वे सुरक्षा दलाच्या गस्त घालणाऱ्या रक्षकांचीही चौकशी करण्यात येत आहे. बुधवारी सिग्नल्स विभागाची चौकशी पूर्ण झाली असून दोघांना निलंबित करण्यात आल्याचे सांगण्यात येते.