तीन महिन्यांत १३४ रुग्णांना संसर्ग

यंदा वर्षांच्या सुरुवातीलाच मुंबईत स्वाइन फ्लूने डोके वर काढले आहे. फ्लूने दोघांचा बळी घेतला असून, १३४ रुग्णांना संसर्ग झाल्याचे पालिकेच्या आकडेवारीतून निदर्शनास आले आहे. राज्यात स्वाइन फ्लूने थैमान घातले असून आत्तापर्यंत १,३४६ रुग्णांना बाधा झाली आहे, तर मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या १२०वर पोहोचली आहे.

गेल्या वर्षी म्हणजे २०१८ साली राज्यात स्वाइन फ्लूने जवळपास अडीच हजार जणांना संसर्ग होऊन ४६२ जणांचा मृत्यू झाला होता. या तुलनेत मुंबईमध्ये मात्र या आजाराचा संसर्ग पसरलेला नव्हता. २०१८ मध्ये मुंबईत २३ रुग्णांना बाधा झाली असून एकाही मृत्यूची नोंद नाही. परंतु, यंदा फेब्रुवारी महिना उजाडताच शहरात स्वाइन फ्लूचा संसर्ग पसरण्यास सुरुवात झाली.

जानेवारीमध्ये एकाही रुग्णाला फ्लूची बाधा झालेली नसून फेब्रुवारीत मात्र ४० रुग्णांची नोंद झाल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. मार्चमध्ये ही संख्या दुपटीवर पोहोचून ८० जणांना बाधा झाली आणि दोन जणांचा बळी गेला आहे.

आग्रीपाडा येथील ३० वर्षांची महिला आणि मधुमेहाची रुग्ण असलेली माझगाव परिसरातील ६५ वर्षांच्या महिलेचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला आहे. ९ मार्चला ती मृत्युमुखी पडली. ‘राज्याच्या तुलनेत मुंबईत स्वाइन फ्लूचा संसर्ग अजून वाढलेला नाही. शहरातील तापमानाच्या चढउतारामुळे फेब्रुवारीनंतर रुग्णांच्या संख्येत वाढ झाली’,असे पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांनी सांगितले.

* जानेवारीपासून मुंबईतील स्वाइन फ्लूची स्थिती : फ्लूची बाधा झालेले रुग्ण- १३४, मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या- २

राज्यातील स्थिती

(१ जानेवारी ते २१ एप्रिलपर्यंतची आकडेवारी )

* बळींची संख्या- १२०

* रुग्ण- १३४६

* उपचाराने बरे झालेले – १००६

* फ्लूची लस दिलेल्या रुग्णांची संख्या- १५,५२४

स्वाइन फ्लूची लक्षणे : तीव्र ताप, कोरडा खोकला, शिंका येणे, घशामध्ये खवखव होणे, थकवा आणि अतिसार किंवा पोटदुखी