22 March 2019

News Flash

वैभव राऊतच्या अटकेनंतर धरपकड सुरु, राज्यभरातून १२ जण ताब्यात

घातपात कटप्रकरणी संपूर्ण राज्यभरात धाडसत्र सुरु असून एकूण १२ जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे

(संग्रहित छायाचित्र)

नालासोपाऱ्यातून वैभव राऊत आणि पुण्यातून तीन संशयितांना अटक केल्यानंतर राज्य दहशतवादविरोधी पथकाची धरपकड अद्यापही सुरु आहे. घातपात कटप्रकरणी संपूर्ण राज्यभरात धाडसत्र सुरु असून एकूण १२ जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. मुंबई, पुणे, सातारा, सोलापूर आणि नालासोपारा येथे ही कारवाई कऱण्यात आली आहे. ताब्यात घेतलेल्या सर्वांची दहशतवादविरोधी पथकाकडून कसून चौकशी केली जात आहे.

वैभव राऊत याच्या घरातून आणि दुकानातून २० गावठी बॉम्ब, स्फोटके आणि बॉम्ब बनविण्याचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे. राज्याच्या विविध भागांत घातपात घडविण्याचा या टोळीचा कट होता, असा पोलिसांचा दावा आहे.

अटक झालेल्या आरोपींनी स्वत: टोळी करून घातपाताची तयारी चालवली होती की त्यांच्यामागे एखादी संघटना वा व्यक्ती आहे, याचा शोध घेण्यास अग्रक्रम दिला जाणार आहे,असे ‘एटीएस’ने सांगितले आहे. आरोपी मुंबईसह नालासोपारा, पुणे, सातारा, सोलापूर या ठिकाणी बॉम्बस्फोट किंवा घातपाती कारवाया करण्याच्या तयारीत होते, असा संशय एटीएसने न्यायालयात व्यक्त केला. न्यायालयाने तिघांना १८ ऑगस्टपर्यंत एटीएस कोठडी दिली आहे.

एटीएसप्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार खबऱ्याने दिलेली माहिती, मोबाइल क्रमांक याआधारे गेल्या दोन आठवडय़ांपासून या तिघावर पोलिसांची बारीक नजर होती. काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागताच ही कारवाई केली गेली.

सोपारा गावातील भंडार आळीतील दोन मजली घरापासून काही अंतरावर असलेल्या ‘साई दर्शन’ या इमारतीच्या तळमजल्यावरील दुकानात हे बॉम्ब ठेवले होते. हे बॉम्ब कमी तीव्रतेचे असून त्यामुळे बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण हे तरुण घेत होते का, या दृष्टीनेही तपास होत आहे. हे बॉम्ब, स्फोटके आणि अन्य वस्तू तपासणीसाठी न्यायवैद्यक प्रयोग शाळेत पाठविण्यात आल्या आहेत. प्रयोगशाळेच्या अहवालातून अनेक गोष्टी स्पष्ट होतील, असे एटीएसचे म्हणणे आहे.

‘साई दर्शन’ ही निवासी इमारत चार मजली आहे. वैभवने ज्या दुकानात बॉम्ब ठेवले होते त्या दुकानाला लागूनच औषधाचे दुकान आहे. तर समोर बाजारपेठ आहे. त्याने बॉम्ब उघडय़ावर ठेवले होते. भरवस्तीत अशा प्रकारे बॉम्ब ठेवणे आणि बॉम्बसाठी लागणारे साहित्य ठेवणे हे धोकायदाक होते असे पोलिसांनी सांगितले. एवढय़ा उघडय़ावर त्याने ही स्फोटके कशी ठेवली, असा प्रश्न पोलिसांना पडला आहे.

तयार बॉम्ब, बॉम्ब बनविण्याचे साहित्य आणि स्फोटके स्वत:जवळ ठेवणारे हे आरोपी दहशतवादी टोळी किंवा संघटनेतील वरच्या फळीतील असावेत, असा अंदाज आहे. हे बॉम्ब कशासाठी तयार केले, साहित्य कुठून आणि कसे मिळवले, त्याचा वापर कुठे-कसा होणार होता, अन्य साथीदार कोण कोण आहेत, याची कसून चौकशी केली जाणार आहे. त्याचबरोबर मालेगावसह आधी घडलेल्या काही घातपातांतही हे आरोपी सामील होते का, याचीही सखोल चौकशी केली जाणार आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रमुख डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे आणि गौरी लंकेश यांच्या हत्येसंदर्भातही या तिघांची चौकशी होणार आहे.

या तिघांविरोधात गैरकृत्ये प्रतिबंधक कायद्यातील १६, १८, २०, भारतीय दंड संहितेतील कलम १२०ब, भारतीय स्फोटके कायदा आणि स्फोटजन्य पदार्थ कायद्यातील विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला.

First Published on August 11, 2018 11:33 am

Web Title: two taken in custody after vaibhav raut arrest in pune