पूर्व आणि पश्चिम उपनगरातील महापालिका रुग्णालयांचा विस्तार

मुंबई : मुंबईच्या पश्चिम आणि पूर्व उपनगरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन उपनगरीय आरोग्यसेवेच्या बळकटीकरणाचा दोन हजार कोटी रुपयांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मुंबई महापालिकेने हाती घेतला आहे.

या प्रकल्पा अंतर्गत पूर्व व पश्चिम उपनगरातील चार प्रमुख रुग्णालयांचा विस्तार व अत्याधुनिकीकरण करून तेथे विशेष- अतिविशेष सेवा देण्यात येणार आहेत. अन्य उपनगरीय रुग्णालये आणि दवाखाने या रुग्णालयांना जोडण्यात येतील.

मुंबईच्या जवळपास सव्वा कोटी लोकसंख्येपैकी तब्बल ९० लाखांहून अधिक लोकसंख्या ही पश्चिम व पूर्व उपनगरात राहात असून उपनगरातील महापालिकेची बहुतेक रुग्णालये ही सामान्य रुग्णालये आहेत. परिणामी उपनगरातील बहुतेक रुग्ण हे मुंबईतील महापालिकेच्या शीव, केईएम व नायर रुग्णालयाकडे धाव घेतात. या रुग्णालयांची उपचाराची क्षमता सुमारे ७० लाख एवढी असताना प्रत्यक्षात या रुग्णालयांमधून एक कोटी ४३ लाख रुग्णांवर बाह्य़रुग्ण विभागात दरवर्षी उपचार केले जातात. हा ताण या रुग्णालयांना पेलणे कठीण होत चालले असल्यामुळे शीव व नायर रुग्णालयाच्या विस्तारीकरणाचाही मोठा प्रकल्प पालिकेने हाती घेतला आहे. तथापि उपनगरातील रुग्णांना हृदयविकार, मेंदू शस्त्रक्रिया, मूत्रपिंड विकारासह प्रमुख आजारांसाठी उपनगरातच विशेष व अतिविशेष सेवा देण्यासाठी  पालिकेने आगामी वर्षांत एक हजार कोटी रुपये खर्चून अत्याधुनिक वैद्यकीय सेवा उपगरातील चार प्रमुख रुग्णालयांमध्ये उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार वांद्रे येथील भाभा रुग्णालयाला सांताक्रूझ येथील व्ही. एन. देसाई व गोरेगाव येथील सिद्धार्थ रुग्णालय जोडण्यात येणार आहे.

कांदिवली येथील बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयाला भगवती रुग्णालय, सावित्रीबाई फुले रुग्णालय, म. वा. देसाई रुग्णालय आणि स. का. पाटील रुग्णालय जोडण्यात येणार आहे. घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयाशी विक्रोळीतील महात्मा जोतिबा फुले रुग्णालय, मुलुंड येथील स्वातंत्र्यवीर सावरकर रुग्णालय तसेच एम. टी. अगरवाल रुग्णालय संलग्न केले जाणार आहे. बोरिवली येथील भगवती रुग्णालयात सध्या ३२३ खाटा असून त्यांची संख्या वाढवून ४९० खाटा करण्यात येणार आहेत. तसेच येथेही विशेष सेवा उपलब्ध करून देण्यात येणार असून यासाठी ५४४ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. एम. टी. अग्रवाल रुग्णालयात सध्या २२५ खाटा असून त्या ४७० केल्या जाणार असून यासाठी ३८० कोटी खर्च होणार आहे. गोवंडी येथील शताब्दी रुग्णालयाचाही विस्तार केला जाणार असून तेथे २१९ वरून ५८० खाटा करण्यात येणार आहेत. यासाठी ४७० कोटी रुपयांचा खर्च आहे. घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात ५९६ खाटांची व्यवस्था केली जाणार असून तेथे डायलिसिस व आगीतील जखमींच्या उपचारासाठी सुपरस्पेशालिटी व्यवस्था निर्माण केली जाणार आहे.

’उपनगरांतील चार मोठय़ा रुग्णालयांना छोटी रुग्णालये जोडण्यात येतील. त्यामुळे रुग्णांना उपनगरांतच अत्याधुनिक आरोग्यसेवा मिळेल.

’उपनगरांतील रुग्ण महापालिकेच्या शीव, केईएम आणि नायर रुग्णालयाकडे धाव घेतात. या आरोग्य प्रकल्पामुळे शहरातील रुग्णालयांवरील ताण कमी होईल.

उपनगरीय रुग्णालयांत

विशेष व अतिविशेष सेवांचा विस्तार करताना पदव्युत्तर वैद्यकीय अधिकाऱ्यांची २७४ पदे भरण्यात येतील. डॉक्टर व परिचारिकांची नियुक्ती केली जाईल. उपनगरातील चारही प्रमुख रुग्णालयांत विशेष व अतिविशेष सेवा देण्यात येणार आहेत. त्यामुळे तेथील रुग्णांना मुंबईकडे धाव घ्यावी लागणार नाही.  – डॉ. अविनाश सुपे, अधिष्ठाता, केईएम रुग्णालय

उपनगरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊनच तेथील आरोग्यसेवेच्या विस्ताराची योजना तयार करण्यात आली आहे. प्रत्येक रुग्णालयात अतिविशेष सेवा देण्याऐवजी चार प्रमुख रुग्णालयांत त्याची व्यवस्था करून अन्य रुग्णालये त्यांच्याशी जोडण्यात येतील. त्याच भागात आरोग्यसेवा देता येईल.   अजोय मेहता,  आयुक्त, महापालिका