बांगलादेशींना भारताचे नागरिक बनवणाऱ्याची करामत

पनवेलच्या जुईगावातील बांगलादेशींसोबत उल्हासनगरमधून अटक केलेल्या व्यक्तीने गेल्या आठ वर्षांमध्ये सुमारे दोन हजारांहून अधिक बनावट पॅनकार्ड आणि असंख्य आधारकार्ड बनवून विकल्याची धक्कादायक माहिती राज्य दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) चौकशीतून समोर आली आहे. या व्यक्तीने सर्वच्या सर्व कार्ड भारतात घुसखोरी केलेल्या बांगलादेशींनाच विकल्याचा एटीएसचा संशय आहे. त्या दृष्टीने या व्यक्तीकडे एटीएस कसून चौकशी करत आहे. १३ मार्च रोजी एटीएसच्या नवीमुंबई पथकाने जुई गावात छापा घालून पाच बांगलादेशींना अटक केली. त्यांच्याकडे आधार आणि पॅनकार्ड आढळली. त्याबाबत चौकशी केल्यानंतर उल्हासनगर येथे वास्तव्यास असलेल्या आरोपीचे नाव पुढे आले. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार आरोपीचे बहुतांश ग्राहक बांगलादेशी घुसखोर होते, असा संशय आहे. त्या दृष्टीने तपास सुरू आहे. या आरोपीने पॅन किंवा आधार कार्ड बनवून दिलेले घुसखोर सध्या कुठे आहेत, काय करतात याबाबत माहिती घेण्याचे काम सुरू आहे.

ग्राहकांकडून तिप्पट पैसे

एटीएसने या व्यक्तीच्या निवासस्थानी छापा टाकला १४ नव्याने तयार केलेली पॅन आणि आधार कार्ड हस्तगत करण्यात आली. तर असंख्य कोरे अर्ज, विविध व्यक्तींची कागदपत्रेही आढळली. चौकशीत गेल्या आठ वर्षांपासून हा आरोपी कागदपत्रे असलेल्या किंवा नसलेल्यांना पॅनकार्ड तयार करून देत होता. एक पॅनकार्ड तो ७०० ते ८०० रुपयांमध्ये तयार करून घेत असे. मात्र त्यासाठी दुप्पट किंवा तिप्पट पैसे ग्राहकाकडून घेत असे. अशा पद्धतीने त्याने गेल्या आठ वर्षांमध्ये दोन हजारांहून अधिक पॅनकार्ड तयार करून विकल्याची माहिती पुढे आली. या अवैध कामासाठी कोणाकोणाची मदत घेतली अधिक चौकशी सुरू आहे.