औद्योगिक-व्यावसायिक वीजमागणीतील घसरणीचा परिणाम

मुंबई: टाळेबंदीपूर्वी मार्चमध्ये नोंदवलेल्या कमाल वीजमागणीच्या तुलनेत ऐन मे महिन्याचा उकाडा सुरू असतानाही दोन हजार मेगावॉटची घट असल्याचे चित्र आहे. टाळेबंदीच्या दोन महिन्यानंतर राज्यातील उद्योग-व्यवसाय काही प्रमाणात सुरू झाले असले तरी ते पुरेशा क्षमतेने सुरू झाले नसल्याने ही घट दिसून येत आहे.

टाळेबंदी जाहीर होण्यापूर्वी १६ मार्च २०२० रोजी राज्यातील कमाल वीजमागणी २० हजार ७४७ मेगावॉट नोंदवली गेली. तर गेल्या दोन दिवसांत राज्याची कमाल वीजमागणी १८ हजार ६८२ इतकी नोंदवली गेली. टाळेबंदीमुळे राज्यातील उद्योग-व्यवसायाची गती मंदावल्याने उन्हाचा पारा वाढत असूनही आणि त्यामुळे घरोघरी दिवस-रात्र वातानुकू लन यंत्रणा, कु लर, पंखे आदी सुरू असूनही मार्चच्या तुलनेत वीजमागणीत दोन हजार मेगावॉटची घट दिसत आहे.  २४ मार्चला रात्री टाळेबंदी जाहीर झाल्याने २५ मार्चपासून राज्यातील उद्योग-व्यवसाय बंद पडले. त्यामुळे त्या काळात वीजमागणी १४ ते १५ हजार मेगावॉटपर्यंत घसरली होती.

२० एप्रिलनंतर देशात व राज्यात काही प्रमाणात उद्योग-व्यवसाय सुरू झाले. राज्यात सध्या ५० हजार उद्योग सुरू आहेत. पण टाळेबंदीच्या नियमांमुळे कमी क्षमतेने उत्पादन सुरू आहे. एप्रिलच्या पहिल्या पंधरवडय़ाच्या तुलनेत आता वीजमागणी वाढली आहे.

२९ मे रोजी दुपारी १२.४५ व वाजता राज्याची विजेची एकूण मागणी २०३५६ मेगावॅट व त्यात मुंबईच्या सरासरी २१०० मेगावॉटचा समावेश होता. म्हणजे राज्याची मागणी १८ हजार २०० मेगावॉटच्या आसपास होती. ही मागणी पुरविण्यात महानिर्मितीने ६६३७ मेगावॉटचे योगदान दिले. त्यात महानिर्मितीच्या औष्णिक संचातून ६२७८ मेगावॉट विजेचा समावेश आहे. या व्यतिरिक्त राज्याला सध्या केंद्रीय वीजप्रकल्पातून सुमारे ६१६६ मेगावॉट तर खासगी वीज उत्पादकांकडून एकूण सुमारे ५४०० मेगावॉट विजेचा पुरवठा होत आहे.