इसवी सनपूर्व दुसऱ्या शतकापासून राजधानीचे शहर आणि जगभरातील प्रमुख बंदरांपैकी एक राहिलेल्या शूर्पारक अर्थात नालासोपाऱ्याला एकविसाव्या शतकात आजही भेट दिली तरी आसपासच्या सर्व गावांमध्ये सर्वत्र विखुरलेले पुरावशेष मुबलक प्रमाणात पाहायला मिळातात. नालासोपारा हे अनेक अर्थानी भारतातील इतर शहरांपेक्षा वेगळे राहिले आहे. आजही नालासोपाऱ्यात घराचे काम करताना किंवा मग शेतामध्ये काम करताना एखादी मूर्ती किंवा पुरावशेष सापडणे हे काही आश्चर्याचे राहिलेले नाही. खरे या पुरावशेषांची एक छोटेखानी परिक्रमाही करणे सहज शक्य आहे.

बोळींजकडील बाजूने नालासोपाऱ्यात प्रवेश केल्यानंतर तिथेच पुरावशेष सापडण्यास सुरुवात होते. इथेच असलेल्या एका पुरातत्त्वीय टेकाडावर मुंबई विद्यापीठाच्या बहि:शाल शिक्षण विभागातील पुराअभ्यासक सिद्धार्थ काळे यांना गणपतीची अनोखी शिल्पकृती सापडली होती. आजवर गणपतीची अनेक रूपे आपल्याला शिल्पकृतीमध्ये पाहायला मिळली आहेत. मात्र सोपाऱ्यात सापडलेले रूप इतरत्र पाहायला मिळत नाही. कोळी बांधव सागरावर जाताना कमरेला एक मोठा रुमाल त्रिकोणी पद्धतीने बांधतात. हा पारंपरिक कोळी वेश आहे. इथे सापडलेल्या शिल्पकृतीतील गणपतीही असाच कोळी वेश परिधान केलेला आहे. ही मूर्ती उत्तर मध्ययुगातील असावी, असा संशोधकांचा कयास आहे.

nashik, Adulterated Goods, Worth Rs 54 thousand, Adulterated Goods Seized, Adulterated prasad, Trimbakeshwar Adulterated prasad, nashik news,
त्र्यंबकेश्वरमध्ये ५४ हजार रुपयांचा भेसळयुक्त माल जप्त
curiosity about indians performance in paris olympic
अन्वयार्थ : असले ‘अव्वल स्थान’ काय कामाचे?
Sonam Wangchuk
लेख: लडाखवासींची लोककेंद्री विकासासाठी हाक
Martand Sun Temple
काश्मीरमधल्या मार्तंड सूर्य मंदिराचा होणार जिर्णोद्धार, अयोध्येतील राम मंदिराशी आहे थेट कनेक्शन

इथून थोडे पुढे गेल्यानंतर पाटील वाडीमध्ये आपल्याला तलावाजवळ भारतीय पुरातत्त्व खात्याचा (एएसआय) बोर्ड पाहायला मिळतो आणि अगदी समोरच्याच बाजूला सुमारे चार फूट उंचीची विष्णूमूर्ती पाहायला मिळते. नंतर नालासोपाऱ्यात फिरताना असे लक्षात येते की, मध्ययुगामध्ये इथे विष्णू ही प्रधान देवता असावी. कारण संपूर्ण सोपाऱ्यात अशा प्रकारच्या पाच विष्णूमूर्ती पाहायला मिळतात. फरक इतकाच की, कधी विष्णूमूर्तीच्या उजव्या हातात गदा असते तर कधी डाव्या. या सर्व मूर्ती एकाच कारागिराने किंवा त्याच्या घराण्यात घडविलेल्या असाव्यात कारण त्याच्या घडणीमध्ये कमालीचे साम्य आहे. अशाच प्रकारची विष्णू शिल्पकृती नंतर पुढे करमाळ्यालाही पाहायला मिळते.

चक्रेश्वर तलावाजवळचे मंदिर म्हणजे तर पुरातत्त्वसंशोधक आणि अभ्यासकांचे आवडते ठिकाणच आहे. इथे मंदिराच्या बाहेरच एक छोटेखानी कुंपण घालून तिथे पुरावशेष हारीने मांडलेले आहेत. यामध्ये गझलक्ष्मी, दोन वैशिष्टय़पूर्ण वीरगळ, स्तूप आदी अनेक शिल्पकृतींचा समावेश आहे. यातील वीरगळांवर ज्येष्ठ पुरातत्त्वज्ञ डॉ. अरिवद जामखेडकर यांनी केलेला शोधप्रबंध प्रसिद्ध आहे. सर्वात महत्त्वाची आहे ती, सुमारे साडेआठ फूट उंचीची ब्रह्मदेवाची मूर्ती. संपूर्ण भारतात ब्रह्मदेवाची मंदिरे अगदी मोजकीच आहेत. विशेष म्हणजे आजच्या ठाणे जिल्ह्य़ामध्ये त्यातील तीन शिल्पकृती पाहायला मिळतात. त्यातील एक ठाण्यामध्ये आहे तर दोन नालासोपाऱ्यात. यावरूनही सोपाऱ्याचे महत्त्व अधोरेखित होते. ब्रह्मदेवाची दुसरी मूर्ती ही चार मुखी असून ती सुळेश्वर मंदिराजवळच्या मैदानात आहे.

चक्रेश्वराच्या मूळ मंदिराला लागूनच एक समाधी मंदिरही आहे. समाधी मंदिराच्या गाभाऱ्याच्या दोन्ही बाजूंस दोन महत्त्वाच्या शिल्पकृती पाहायला मिळतात. या पूर्वी इथेच असलेल्या एका मोठय़ा मंदिरातील मूर्ती असाव्यात. यातील एक शिल्पकृती ही वराहाची आहे. केवळ वराहाची अशी शिल्पकृती ज्या ठिकाणी सापडली आहे, त्या ठिकाणी आजवर विष्णूच्या इतर अवतारांच्याही शिल्पकृती सापडल्या आहेत. त्या मुळे या परिसरात शोध घेतल्यास इतरही आणखी शिल्पकृतींचा खजिना हाती लागावा.

मूळ मंदिराच्या आतमध्ये एका बाजूस शोकेससारख्या बंद भागामध्ये इतरही काही पुरावशेष आहेत. यामध्ये गणपती, अंबिका, सुरसुंदरी अशा अनेक शिल्पकृतींचा समावेश आहे. यातील बरेचसे पुरावशेष हे जैन मंदिराचे आहेत. अंबिका ही जैन देवता आहे. तिचा संबंध सुफलनाशी

जोडलेला आहे. तिच्या हाती असलेल्या लहान मुलाच्या संकेतावरून तिची ओळखनिश्चिती केली जाते. या ठिकाणी एक चांगले संग्रहालय सहज होऊ शकते. गावकऱ्यांचा तसा प्रयत्नही असल्याचे कळते.

त्यानंतर आपण पोहोचतो ते टाकीपाडा परिसरामध्ये. एरवी हा परिसर झोपडपट्टीसदृश आहे. इथे बैठी वस्तीच अधिक दिसते. ही वस्ती ज्या उंच अशा टेकाडावर आहे ते पुरातत्त्वीय टेकाड आहे. इथे इसवी सनपूर्व दुसऱ्या ते तिसऱ्या शतकातील असंख्य विटा सर्वत्र विखुरलेल्या दिसतात तर भलेमोठे कातलेले दगडही सहज नजरेस पडतात. या ठिकाणी एखादे मोठे मंदिर किंवा तत्कालीन स्तूपाचे अवशेष सापडावेत, असे अभ्यासकांना वाटते. पूर्वी या परिसरात असलेल्या एका मोठय़ा पाण्याच्या टाकीमुळे याला टाकिपाडा असे नाव पडले. मात्र हा परिसर त्यापूर्वी देव्हारे म्हणून ओळखला जायचा. आजवर गवेषणांमध्ये असे लक्षात आले आहे की, स्थळनामाला विशेष महत्त्व असते. हे स्थळनाम आपल्याला बऱ्याजदा खूप काही सहज सांगून जाते. देव्हारे या नावाचा संबंध इथे कधी काळी असलेल्या मंदिराशीच असण्याची दाट शक्यता आहे.

नालासोपाऱ्यामध्ये असलेल्या या पुरावशेषांचे एखादे संग्रहालय नालासोपाऱ्यातच करण्यात आले तर इथे बौद्ध स्तूप पाहायला येणाऱ्या पर्यटक, अभ्यासकांसाठी आणखी एक चांगले आकर्षण ठरू शकते. शिवाय त्या निमित्ताने या पुरावशेषांचे जतनही होईल आणि नालासोपाऱ्याचे प्राचीन महत्त्व जनतेला कळण्यास मदतही होईल.

विनायक परब vinayak.parab@expressindia.com

@vinayakparab