डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू (बाटू) डॉ. व्ही. आर. शास्त्री यांनी विद्यापीठाच्या कामकाजातील शासकीय हस्तक्षेपाला कंटाळून शुक्रवारी राजीनामा दिला. जळगाव विद्यापीठाच्या कुलगुरूंनीही याच कारणास्तव राजीनामा दिल्याचे समजते.

लोणेरे येथील ‘बाटू’चा पदभार डॉ. शास्त्री यांनी मार्च २०१९ मध्ये स्विकारला होता. अध्यापन, प्रशासन आणि संशोधन क्षेत्रातील कामगिरी लक्षात घेऊन डॉ. शास्त्री यांची नियुक्ती या पदावर करण्यात आली होती.

स्थापनेपासून काहिशा दुर्लक्ष झालेल्या या विद्यापीठाची गाडी डॉ. विलास गायकर आणि त्यानंतर डॉ. शास्त्रींनी रुळावर आणली. तंत्रशिक्षण विद्यापीठात श्रेयांक पद्धतीची प्रभावी अंमलबजावणी, अभियांत्रिकीच्या शाखा निवडीचे स्वातंत्र्य, अनेक देशी-परदेशी विद्यापीठांबरोबर करार अशा अनेक गोष्टी या विद्यापीठात झाल्या. मात्र, पदभार स्वीकारल्यापासून दोन वर्षांतच डॉ. शास्त्री यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांचा कार्यभार रसायन तंत्रज्ञान संस्थेचे (आयसीटी) कुलगुरू डॉ. अनिरुद्ध पंडित यांच्याकडे सोपवण्यात येणार आहे. याबाबत डॉ. शास्त्री यांनी प्रतिक्रियेस नकार दिला. त्याचबरोबर जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. पी. पाटील यांनीही राजिनामा दिल्याचे समजते आहे.

वाढता शासकीय हस्तक्षेप

राज्यातील विद्यापीठांच्या कामकाजात शासकीय हस्तक्षेप वाढत असल्याचा आक्षेप शिक्षण वर्तुळात सातत्याने घेण्यात येत आहे. विद्यापीठातील कामे, कंत्राटे यांबाबत मंत्रालयातून येणाऱ्या सूचनांच्या कथा सर्वच विद्यापीठांमध्ये चर्चेत आहेत. मंत्री, कुलपती, विद्यापीठांचे कुलगुरू यांच्यातील वादाचे प्रसंग उजेडात आले आहेत. राज्यातील दोन विद्यापीठांच्या कुलगुरूंनी तडकाफडकी राजीनामा देण्यामागेही वाढता शासकीय हस्तक्षेप कारणीभूत असल्याची चर्चा अधिकारी आणि विद्यापीठ वर्तुळात सुरू आहे. याबाबत उच्चशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.