आपात्कालीन परिस्थितीत औषधे, वैद्यकीय सेवा पुरविणार

मुंबई : मुंबईमधील रहदारी आणि वाहतूक कोंडीच्या ठिकाणी आपात्कालीन परिस्थितीमध्ये रुग्णांना तात्काळ सेवा मिळण्याच्या उद्देशाने सुरू केलेली दुचाकी रुग्णवाहिका सेवा आता आदिवासी पाडय़ांपर्यंत पोहचणार आहे. यासाठी २० नव्या दुचाकींचा समावेश या सेवेमध्ये करण्यात आला असून याचे लोकार्पण मंगळवारी परिवहनमंत्री दिवाकर रावते, शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले. या वेळी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीपकुमार व्यास, आरोग्य सेवा आयुक्त डॉ. संजीव कुमार, आरोग्य संचालक डॉ. संजीव कांबळे, अतिरिक्त प्रकल्प संचालक डॉ. सतीश पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

मुंबईमध्ये ऑगस्ट २०१७ मध्ये दहा दुचाकी रुग्णवाहिका सुरू करण्यात आल्या होत्या. भांडुप, मानखुर्द, धारावी, नागपाडा, मालाड, चारकोप, गोरेगाव, कांदिवली, कलिना आणि खारदांडा या भागामध्ये सुरू केलेल्या या रुग्णसेविकांच्या माध्यमातून ऑगस्ट २०१७ ते मे २०१८ या कालावधीमध्ये सुमारे १२०० रुग्णांना आपात्काकालीन परिस्थितीमध्ये वैद्यकीय सेवा पुरविण्यात आली आहे.

दुचाकी रुग्णवाहिकांची आवश्यकता वाढत असल्याने अजून २०नव्या रुग्णवाहिका मंगळवारपासून सुरू करण्यात आल्या. या रुग्णवाहिका मुंबईसह ठाणे, पालघर, नंदुरबार, अमरावती दुर्गम भागामध्ये पाठविण्यात येणार आहेत.

काय आहे दुचाकी रुग्णवाहिका?

* दुचाकी रुग्णवाहिकेचा चालक हा बीएएमस डॉक्टर असून आपात्कालीन परिस्थितीमध्ये रुग्णाला त्या ठिकाणी तात्काळ पोहचून सेवा देतो.

* या रुग्णवाहिकेमध्ये हृदयविकार, अस्थमाचा झटका अशा आपात्कालीन स्थितीमध्ये तात्काळ वैद्यकीय सेवा देण्याची साधने, अपघातामध्ये जखमी झालेल्या रुग्णांना वैद्यकीय मदत देण्याची साधने यासह गरोदर महिलेती प्रसूती करण्याची सर्व साधने उपलब्ध असतात.

* लहान मुलांसह मोठय़ा व्यक्तींसाठी गरज लागल्यास कृत्रिम श्वासोच्छ्वासाची साधने यामध्ये समाविष्ट असतात.