देशभरातील अपघातांच्या घटनांत २८.८ टक्के दुचाकीस्वार

देशभरात होणाऱ्या रस्ते अपघातांमध्ये दुचाकींचा समावेश असल्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. देशात होणाऱ्या एकूण अपघातांपैकी १.४० लाख अपघातांमध्ये म्हणजेच तब्बल २८.८ टक्के अपघातांमध्ये दुचाकींचा समावेश असतो, असे ‘भारती अ‍ॅक्सा जनरल इन्शोरन्स’ या कंपनीने केलेल्या पाहणीत आणि केंद्र सरकारच्या आकडेवारीत समोर आले आहे. विशेष म्हणजे रस्त्यांवर चालणाऱ्या दुचाकींपैकी ७५ टक्के दुचाकींचा विमाही काढला नसल्याने ही परिस्थिती अधिक गंभीर बनते.

भारतात गेल्या वर्षी जवळपास ४.८६ लाख रस्ते अपघात झाले. त्यापैकी १.४० लाख अपघातांमध्ये दुचाकींचा समावेश होता. हे प्रमाण एकूण रस्ते अपघातांच्या २८.८ टक्के एवढे होते. हे प्रमाण २०१३ पासून गेल्या तीन वर्षांमध्ये वाढले आहे. २०१३ मध्ये २६.३ टक्के अपघातांमध्ये दुचाकींचा समावेश होता, तर २०१४ मध्ये हे प्रमाण २७.३ एवढे होते. २०१५ मध्ये हे प्रमाण १.५ टक्क्यांनी वाढून २८.८ टक्क्यांवर पोहोचले आहे.

दुचाकी अपघातांमागे बेदरकारपणे दुचाकी चालवण्याबरोबरच नियमांचे उल्लंघन करून वाहन चालवल्याचेही कारण असते. त्याशिवाय महत्त्वाची गोष्ट म्हणजे देशभरातील तब्बल ७५ टक्के दुचाकींचा विमाच उतरवलेला नसल्याचे केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार समोर आले आहे. ३० टक्के दुचाकीचालक दर वर्षी नियमाने आपल्या दुचाकीचा विमा उतरवण्यास विसरतात, तर ३६ टक्के चालकांना विमा उतरवण्याची प्रक्रिया अत्यंत किचकट वाटते, असे ‘भारती अ‍ॅक्सा’ने केलेल्या पाहणीत समोर आले आहे. त्यासाठी एकाच वेळी तीन वर्षांसाठी विमा देऊ केल्यास ८२ टक्के लोकांना तसे आवडेल, असेही पाहणीत म्हटले आहे. या दृष्टीने आता प्रयत्न होणार असल्याचे ‘भारती अ‍ॅक्सा’तर्फे सांगण्यात आले.

भारतातील अपघातांची आकडेवारी

वाहन प्रकार      अपघात       टक्केवारी

दुचाकी           १,४०,०००        २८.८

चार चाकी        १,१४,०००        २३.६

अवजड वाहने    ९५,७४२         १९.७

बसगाडय़ा         ४०,३३८         ०८.३

तीन चाकी       २९,६४६         ०६.१