‘एडीपीकेडी’ आजाराने त्रस्त रुग्णांना नवे जीवन

मुंबई : ऑटोसोमल पॉलिसिस्टिक किडनी डिसीज (एडीपीकेडी) हा मूत्रपिंडाचा आनुवंशिक आजार असलेल्या रुग्णाच्या शरीरातून ७ किलो व ५.८ किलो वजनाची मूत्रपिंडे ग्लोबल रुग्णालयात काढली असून स्वाॅप पद्धतीने गोवा आणि अमरावतीमधील या रुग्णांच्या पत्नींनी एकमेकींच्या पतींना मूत्रपिंड दान करीत दोघांचे प्राण वाचविले. इतक्या जास्त वजनाची मूत्रपिंडे काढल्याची ही भारतातील पहिलीच शस्त्रक्रिया असल्याचा दावा रुग्णालयाने केला आहे.

गोव्याचे रहिवासी रोमन (४१) यांची एडीपीकेडी आजारामुळे दोन्ही मूत्रपिंडे निकामी झाली होती. ते डायलिसिसवर होते. यात मूत्रपिंडामध्ये अनेक गळू तयार होतात. त्यामुळे मूत्रपिंडाच्या ऊतींची कार्यक्षमता कमी होते. ग्लोबल रुग्णालयात आल्यानंतर तपासणीमध्ये मूत्रपिंडामधील अडचणी समोर आल्या.

सामान्य मूत्रपिंडाचे वजन सुमारे १५० ग्रॅम असते आणि त्याची लांबी सुमारे ८-१० सेंमी असते. पण रोमन यांच्या शरीरातून काढण्यात आलेल्या मूत्रपिंडांचे वजन ७ किलो व ५.८ असे एकूण १२.८ किलो होते. तर लांबी सुमारे २६ सेंमी आणि २१ सेंमी होती. त्यामुळे ओपन शस्त्रक्रिया करून मूत्रपिंड काढण्यात आल्याची माहिती रुग्णालयातील युरोलॉजी व रेनल प्रत्यारोपण विभागाचे संचालक डॉ. प्रदीप राव यांनी दिली.

रोमन यांच्या पत्नीचा रक्तगट जुळत नसल्याने रुग्णालयातील दात्यांच्या नोंदीमध्ये दुसऱ्या दात्यांचा शोध सुरू होता. त्या वेळी अमरावती येथील निखिल यांनाही मूत्रपिंडाची आवश्यकता होती. त्यांच्या पत्नीचा रक्तगट आणि ऊतींपासून सर्व बाबी जुळत असल्याने दोन्ही रुग्णांच्या पत्नींचे समुपदेशन केले गेले. त्यावर दोन्ही पत्नींनी पुढाकार घेत एकमेकींच्या पतींना मूत्रपिंड दान केले.

‘माझ्या आईलाही या आजारामुळे झालेला त्रास मी पाहिला आहे. १० वर्षांपूर्वी मला एडीपीकेडी असल्याचे निदान झाले आणि त्यावर औषधांनी उपचार करण्यात आले.

सुमारे दीड वर्षांपासून माझी प्रकृती खालावत चालली होती आणि दैनंदिन कामे करणेही शक्य होत नव्हते. माझे पोट फुगत चालले होते आणि वजनही वाढत चालले होते. पहिल्या शस्त्रक्रियेनंतर माझे सुमारे २५ किलो वजन कमी झाले. आता माझी प्रकृती हळूहळू पूर्वपदावर येत आहे,’ असे व्यक्त करीत रोमन यांनी अमरावतीच्या कुटुंबाचे आभार मानले.

जेव्हा रक्तगट किंवा ऊती जुळत नसते तेव्हा अदलाबदल (स्वॅप) प्रत्यारोपण हा चांगला पर्याय असतो आणि त्यामुळे दाते मिळविता येतात. रक्तगट किंवा ऊतींचा प्रकार जुळत नसताना करण्यात येणाऱ्या पेअर्ड किडनी एक्स्चेंज किंवा स्वॅप प्रत्यारोपणाविषयी अधिकाधिक जागरूकता निर्माण करणे ही काळाची गरज असल्याचे रुग्णालयातील रेनल सायन्सेसचे संचालक डॉ. भरत शहा यांनी सांगितले.