चेंबूरच्या सुमन नगर भागात जलवाहिनी दुरुस्तीचे काम करत असताना विजेचा धक्का लागून दोन कामगारांचा मृत्यू झाला. तर आणखी पाच जण जखमी झाले. जखमींना घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल केले आहे.

पूर्व द्रुतगती मार्गावरील चेंबूरच्या सुमन नगर येथे सोमवारी सकाळी आठच्या सुमारास खोदकाम सुरू असताना भूमिगत जलवाहिनी फुटली. पालिकेने दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेतले. मात्र खड्डयामध्ये मोठय़ा प्रमाणात पाणी साचले. ते उपसण्यासाठी कामगारांनी विजेचा पंप सुरू केला. त्यानंतर दुरुस्तीसाठी सात कामगार खड्डय़ात उतरले असता विजेचा पंपामुळे कामगारांना विजेचा धक्का बसला. त्यात गणेश उगले (वय ४५) आणि अमोल काळे (वय ४०) या दोघांचा मृत्यू झाला. तर नानासाहेब पुकाळे (वय ४१), महेश जाधव (वय ४०), नरेश आधानगले (वय ४०), राकेश जाधव (वय ३९) आणि अनिल चव्हाण (वय ४३) हे पाचजण जखमी झाले आहेत.

चौकशीचे आदेश

या दुर्घटनेबाबत महानगरपालिकेचे जल अभियंता अथवा उपजल अभियंता (पूर्व उपनगरे) यांनी त्वरित चौकशी करून त्याबाबतचा ‘चौकशी अहवाल’ येत्या १५ दिवसांत सादर करण्याचे आदेश अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी जल अभियंता खात्याला दिले आहेत.