लोणावळा परिसरात फिरण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांचा पवना डॅममध्ये बुडून मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली. डॅममध्ये उतरलेल्या तरुणांना पाण्याचा अंदाज न आल्यानं ते बुडाले, अशी माहिती समोर आली आहे. अमय दिलीप राहते (वय २५), तेजस रवी फांगम (वय २२) अशी मृतांची नावे आहेत.

मुंबईतील काळा चौकी परिसरात राहणारे अमेय राहते, तेजस फांगम, साई प्रसाद मिस्त्री हे आणखी एका मित्रासह लोणावळा परिसरात फिरण्यासाठी आले होते. स्वतःची कार घेऊन आलेले चौघेही पवना डॅम येथे आले. पवना डॅमवर आल्यानंतर त्यांची दंगामस्ती सुरू झाली. याचवेळी अमेय आणि तेजस हे दोघे डॅममधील पाण्यात उतरले. पण, पाण्याचा अंदाज न आल्यानं दोघेही बुडायला लागले. त्यांना साई प्रसाद आणि सोबतच्या मित्रानं वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा प्रयत्न अयशस्वी ठरला. यातच अमेय आणि तेजस यांचा बुडून मृत्यु झाला. रविवारी दुपारी घडलेल्या या घटनेची माहिती लोणावळा पोलिसांना संध्याकाळी मिळाली. याप्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरू केला असून, दोन्ही मयत तरुणांना पोहता येत नव्हते, अशी माहिती पोलिसांनी दिली.

त्यांना वाचवण्यासाठी ‘ते’ २५ किलोमीटर गेले –

अमेय आणि तेजस बुडूत असल्याचं पाहून साई प्रसाद आणि त्यांच्या मित्रानं वाचवण्याचा प्रयत्न केला. पण, तरीही ते बुडाले. थोड्या वेळानं अमेय आणि तेजसला बाहेर काढण्यात आलं. त्यानंतर त्या दोघांना कारमधून तब्बल २५ किमी घेऊन रूग्णालयात आले. पण, तोपर्यंत दोघांचाही मृत्यु झाला होता.