चुकीचे ‘क्रेडिट’ दिले गेल्याने ‘तृतीय वर्ष कला शाखे’च्या (टीवायबीए) एप्रिल, २०१५मध्ये झालेल्या पाचव्या सत्राच्या परीक्षेचा निकाल पुढील तीन दिवसांत दुरुस्त करून येत्या सहा दिवसात जाहीर करण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठाने घेतला आहे. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांना प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागणार असून त्याचा विद्यार्थ्यांच्या केवळ पाचव्या सत्राच्याच नव्हे तर अंतिम निकालावरही आहे. अनेकांचा निकाल यामुळे घसरण्याची शक्यता असून त्यामुळे काहींचे पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे प्रवेशही अडचणीत येण्याची शक्यता आहे.
‘लोकसत्ता’ने या संदर्भात वृत्त दिल्यानंतर विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने तातडीने बैठक बोलावत हा निकाल दुरुस्त करून नव्याने जाहीर करण्याचा निर्णय दोन दिवसांपूर्वी घेतला होता. ही परीक्षा ‘टीवायबीए’च्या पाचव्या सत्राच्या पुनर्परीक्षार्थीकरिता घेण्यात आली होती. त्याला ४,६०९ विद्यार्थी बसले होते. परंतु, यापैकी ‘पेपर क्रमांक ६’ची परीक्षा दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा निकाल बदलणार आहे. किमान अडीच ते तीन हजार विद्यार्थ्यांना तरी याचा फटका बसणार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. श्रेयांक-श्रेणी पद्धतीने लावल्या गेलेल्या या निकालात सहाही सत्रांच्या परीक्षांचे मूल्यांकन करून एकत्रित निकाल जाहीर केला गेला होता. त्यामुळे, या घोळाचा फटका बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा अंतिम निकाल तयार करावा लागणार आहे.