09 August 2020

News Flash

बालकांना विषमज्वराची मोफत लस

बालकांना पुढील तीन महिन्यांत विषमज्वराची मोफत लस उपलब्ध होणार आहे

बालकांना पुढील तीन महिन्यांत विषमज्वराची मोफत लस उपलब्ध होणार आहे.

वयाची दोन ते पाच वर्षे पूर्ण केलेल्या बालकांना पुढील तीन महिन्यांत विषमज्वराची मोफत लस उपलब्ध होणार आहे. यासाठी मुंबई महानगरपालिकेने दीड कोटीची तरतूद केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या विस्तारित लसटोचणी कार्यक्रमात या लसीचा समावेश नसल्यामुळे पालिकेने पुढाकार घेत मुंबईतील बालकांसाठी विषमज्वराची ‘व्ही आय पॉलिसॅकराइड’ लस उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने योजिलेल्या लसटोचणी कार्यक्रमात पोलिओ, क्षयरोग, गोवर, हेपॅटायटिस बी, धनुर्वात, डांग्या खोकला या रोगांपासून रक्षण करण्यासाठी पाच वर्षांच्या आतील बालकांसाठी लस दिली जाते. यामध्ये विषमज्वराची लस नसल्याने पालिका रुग्णालयांमध्ये आलेल्या नागरिकांना खासगी रुग्णालयात पैसे भरून ही लस घ्यावी लागत होती. मात्र यापुढे विषमज्वराची लस घेण्यासाठी रुग्णांना खासगी रुग्णालयात जावे लागणार नाही, तर पालिका रुग्णालयात, सर्वसाधारण रुग्णालय, प्रसूतिगृह येथे ही लस उपलब्ध असेल.

विषमज्वर रोगाच्या प्रतिबंधाकरिता व्ही आय पॉलिसॅकराइड ही लस उपलब्ध असते. या आर्थिक वर्षांपासून पालिका रुग्णालयांत विषमज्वराची मोफत लस उपलब्ध असेल. सध्या यावर काम सुरू असून येत्या ३ ते ४ महिन्यांत पालिका रुग्णालयांत ही लस बालकांसाठी मोफत देण्यात येईल, असे कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांनी सांगितले.

ही लस प्रतिबंधात्मक असल्यामुळे पालिका रुग्णालयांत येणाऱ्या लाखो बालकांना याचा उपयोग होणार आहे, असे नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले.

लस महत्त्वाची

लहान मुलांना विषमज्वर होऊ नये यासाठी २ ते ५ वर्षांतील मुलांना ही प्रतिबंधात्मक लस दिली जाते. या लसीमुळे तीन वर्षे संरक्षण मिळते, मात्र त्यानंतर पुन्हा लस घेणे आवश्यक आहे. ५ ते १९ वयोगटातील मुलांमध्ये या रोगाचे प्रमाण जास्त आढळते, त्यामुळे पाच वर्षांपूर्वीच ही लस देणे गरजेचे आहे. ही लस दिल्यानंतर इंजेक्शनच्या जागी सूज येणे, दुखणे, ताप, डोकेदुखी, उलटय़ा, अतिसार किंवा अंगावर पुरळ येणे यांसारखे परिणाम दिसतात, मात्र काही दिवसांत हा परिणाम कमी होतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2017 4:46 am

Web Title: typhoid fever vaccine free for children
Next Stories
1 मुंबईत स्वाइन फ्लूचा पहिला बळी
2 रहदारीच्या आड येणाऱ्या पुतळ्यांना आता परवानगी नाही
3 उच्च न्यायालयाचे ठाणे पालिका आयुक्तांवर ताशेरे
Just Now!
X