गेल्या निवडणुकीत सातारा मतदारसंघात निवडून आल्यापासून राष्ट्रवादीच्या नेतृत्वाशी फटकून वागणारे किंवा पक्षापेक्षा आपले वेगळे अस्तित्व दाखविणारे खासदार उदयनराजे भोसले निवडणूक जवळ आल्याने पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या जवळ आले आहेत.
गेली पाच वर्षे राष्ट्रवादीच्या कोणत्याही कार्यक्रमाला हजेरी न लावणारे उदयनराजे भोसले आता मात्र राष्ट्रवादीच्या मुंबईतील मुख्यालयात दिसू लागले आहेत. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी मतदारसंघनिहाय आढावा घेतला तेव्हा सातारा मतदारसंघाच्या बैठकीच्या वेळी ते अनुपस्थित होते. पण माढा मतदारसंघाच्या बैठकीला ते उपस्थित राहिले होते. शुक्रवारी शरद पवार यांनी राज्यसभेसाठी अर्ज भरला तेव्हा विधान भवनात खासदार उदयनराजे भोसले पवार यांच्याबरोबरच होते. त्या दिवशी सकाळी खासदार भोसले यांनी पवार यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती.
पक्षाशी फटकून वागणाऱ्या उदयनराजे भोसले यांना पक्षाने पुन्हा उमेदवारी देऊ नये, अशी मागणी सातारा जिल्’ाातील पक्षाच्या नेत्यांनी केली होती. त्यातच उदयनराजे भोसले यांनी मध्यंतरी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने उलटसुलट चर्चा सुरू झाली होती. अजित पवार यांच्याशी उदयनराजे यांच्याशी पटत नसले तरी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या ते संपर्कात असतात, असे राष्ट्रवादीच्या गोटातून सांगण्यात आले. निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी आणि उदयनराजे उभयतांना एकमेकांची गरज भासणार आहे. त्यातूनच भोसले राष्ट्रवादीच्या कार्यालयात फिरकू लागल्याची चर्चा आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 26, 2014 3:16 am