छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील पूल कोसळून सहा जणांचा मृत्यू, तर ३० जण जखमी झाले असताना त्यांच्याकडे पाठ फिरवून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे विदर्भात युतीच्या संयुक्त मेळाव्यात निवडणूक प्रचारात गुंतल्याने सर्वसामान्य मुंबईकरांमध्ये संताप व्यक्त होत असून विरोधी पक्षांनीही त्यांच्यावर टीकेचा भडिमार केला आहे.

पूल दुर्घटनेतील जखमींची शुक्रवारी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. त्यानंतर ते युतीच्या संयुक्त मेळाव्यांसाठी विदर्भाकडे रवाना झाले. मात्र, मुंबई पालिकेच्या सत्तेची सूत्रे सांभाळणारे उद्धव ठाकरे यांनी जखमींकडे पाठ फिरवली. ते थेट मुख्यमंत्र्यांसोबतच्या संयुक्त मेळाव्यांसाठी रवाना झाले.

एकाच राजकीय कार्यक्रमासाठी जाणाऱ्या दोन नेत्यांच्या या वर्तनातील फरकामुळे चर्चा सुरू झाली. ठाकरे यांना जखमींची विचारपूस करण्यासाठी वेळ नाही, पण प्रचारासाठी आहे, असा संतप्त सूर उमटू लागला. स्वाभाविकच विरोधी पक्षांनी ही संधी साधत उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनीही शुक्रवारी रुग्णालयात जखमींची भेट घेतली.

मुंबई महापालिकेत दोन दशकांहून अधिक सत्ता उपभोगणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे मृतांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करायला आणि जखमींची विचारपूस करायला वेळ नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे. मरिन ड्राइव्हवरील ओपन जिमसारख्या किरकोळ गोष्टींचे उद्घाटन करण्याचे श्रेय घ्यायला उद्धव ठाकरे पुढे आले. मात्र, चुकार पालिका अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे धाडस ठाकरे दाखवत नाहीत. सत्ताधारी पक्षाचे प्रमुख या नात्याने जबाबदारीला सामोरे जात नाहीत. मुंबईकर हे सर्व उघडय़ा डोळ्यांनी पाहत असून ते शिवसेनेला नक्कीच धडा शिकवतील, असेही मलिक म्हणाले.

शिवसेनेच्या प्रवक्त्या आमदार मनीषा कायंदे यांनी मात्र, विरोधकांची टीका म्हणजे निव्वळ कांगावा असल्याचे म्हटले आहे. दुर्घटना घडल्यानंतर शिवसेनेचे स्थानिक खासदार अरविंद सावंत, महापौर विश्वनाथ महाडेश्वर आदी सर्व नेते मंडळी घटनास्थळी, रुग्णालयात पोहोचली. जखमींना वेळेत चांगले उपचार मिळावेत याकडे त्यांनी लक्ष ठेवले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे प्रतिनिधी म्हणूनच शिवसेनेचे हे सर्व नेते काम करत होते. निवडणुकांच्या काळात आता विरोधकांकडे मुद्दा उरलेला नाही, त्यात भाजप-शिवसेना युती झाल्याने विरोधकांचे मनोधैर्य खचल्यानेच ते खोडसाळपणे दुर्घटनेवरून राजकारण करत आहेत, असे मनीषा कायंदे यांनी सांगितले.