मेट्रो प्रकल्पाची कारशेड आरे कॉलनीत उभारण्यावरून  पर्यावरणवादी संस्था सरकारविरोधात निदर्शने करीत असताना, आरे येथील मेट्रो कारशेडचे ‘नाणार’ होणार, असा सूचक इशारा शिवसेनेचे कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे यांनी  सोमवारी  दिला.

बेस्टच्या कार्यक्रमानंतर ठाकरे यांना, आरे येथील कारशेडचे काय होणार, असे विचारता नाणारप्रमाणेच कारशेडचे भवितव्य होणार, असे सांगून शिवसेना विरोधाच्या भूमिकेवर ठाम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे या मुद्दय़ावरूनही शिवसेना व भाजपची जुंपणार असल्याचे चित्र आहे.

नाणार येथील हरित पेट्रोरिफायनरी प्रकल्पाला स्थानिक रहिवाशांनी विरोध केला आणि शिवसेनेने त्यास पाठिंबा दिला. लोकसभा निवडणुकीत युतीची बोलणी सुरू असताना शिवसेनेने नाणार प्रकल्प रद्द करण्याची अट घातली. त्यामुळे सरकारने तसा निर्णय घेतला होता.

शिवसेना कार्यकारी प्रमुखांनी राम मंदिर बांधण्याविषयीही भूमिका स्पष्ट केली. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने ज्याप्रमाणे जम्मू व काश्मीरला स्वायत्तता देणारे ३७०वे कलम रद्द केले, त्याच पद्धतीने अयोध्येत राममंदिर बांधावे, अशी मागणी  ठाकरे यांनी केली.

लोकसभा निवडणुकीआधी शिवसेनेने भाजपवर दबाव आणण्यासाठी राममंदिराचा मुद्दा ऐरणीवर आणला होता.  आगामी विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवरही शिवसेनेने राममंदिराचा मुद्दा पुन्हा तापविण्यास सुरुवात करून भाजपला आव्हान दिले आहे.

ठाकरे म्हणाले, आम्ही किती काळ थांबायचे? राममंदिराचा मुद्दा १९९०-९२ पासून सुरू झाला असून शिवसेनेने पहिल्या दिवसापासून शिवसेना त्यासाठी आग्रही राहिली आहे. केंद्र सरकारने जम्मू व काश्मीरसाठीचे ३७० कलम ज्या पद्धतीने खंबीरपणे निर्णय घेऊन रद्द केले, त्याच धर्तीवर राममंदिर बांधण्याचा निर्णय स्वतच्या अधिकारात घ्यावा. त्यासाठी विशेष कायदाही करावा. सर्वोच्च न्यायालयातही राममंदिराचा विषय प्रलंबित असून न्यायालयानेही लवकरात लवकर निर्णय द्यावा, अशीही विनंती आहे.

राजकीय लाभ उठवण्याचे प्रयत्न

राममंदिराची पहिली वीट रचण्यासाठी शिवसेना कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे, असे आवाहन करून ठाकरे यांनी आता विधानसभा निवडणुकीच्या आधी हिंदुत्वाचा मुद्दा पुन्हा तापविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असल्याने केंद्र सरकार सध्या कोणताही निर्णय घेणार नाही. तरीही हा मुद्दा उपस्थित करून कायदा करण्याची मागणी करून राजकीय लाभ उठविण्याचे शिवसेनेचे प्रयत्न आहेत.