21 January 2018

News Flash

उद्धव ठाकरेंना विश्रांतीचा सल्ला

गेल्या चार दिवसांपासून झालेली दगदग आणि मानसिक तणावामुळे शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांना डॉक्टरांनी विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे ‘मातोश्री’वर आलेल्या नगरसेवकांना उद्धव ठाकरे

प्रतिनिधी, मुंबई | Updated: November 18, 2012 3:36 AM

गेल्या चार दिवसांपासून झालेली दगदग आणि मानसिक तणावामुळे शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांना डॉक्टरांनी विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे ‘मातोश्री’वर आलेल्या नगरसेवकांना उद्धव ठाकरे भेटू शकले नाहीत. अखेर रश्मी ठाकरे आणि शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी नगरसेवकांशी संवाद साधला आणि त्यांना प्रभागांमध्ये परतण्याचे आवाहन केले.
बुधवारी सायंकाळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती ढासळल्यामुळे तमाम शिवसैनिकांनी वाद्रय़ातील कलानगरामधील ‘मातोश्री’ या निवासस्थानी धाव घेतली होती. मात्र नगरसेवकांना ‘मातोश्री’मध्ये सोडण्यात आले नव्हते. त्यामुळे गेले तीन दिवस ते बाहेरच ठिय्या मांडून बसले होते. उद्धव ठाकरे यांनी आपल्याला एकदा तरी भेटावे अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. महापौर सुनील प्रभू यांनी नगरसेवकांचा निरोप उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचवला आणि त्यांनी शनिवारी सकाळी ११ वाजता नगरसेवकांना भेटीची वेळ दिली होती. त्यानुसार शनिवारी सकाळी नगरसेवक ‘मातोश्री’वर दाखल झाले. मात्र गेल्या चार दिवसांपासून कमालीचा ताण पडल्यामुळे उद्धव ठाकरे यांची प्रकृती बिघडली होती. त्यामुळे त्यांनी विश्रांती घ्यावी, असा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना नगरसेवकांना भेटता आले नाही. ‘मातोश्री’वर जमलेल्या शिवसेना नगरसेवकांशी रश्मी ठाकरे आणि मनोहर जोशी यांनी संवाद साधला. शिवसेनाप्रमुखांची प्रकृती सुधारत असून त्यांच्यासाठी प्रार्थना करावी. त्यांना अपेक्षित असलेले काम प्रभागांमध्ये करावे. ‘मातोश्री’ बाहेर गर्दी करण्याऐवजी आपापल्या प्रभागात जावून नागरी समस्या सोडवाव्यात, असे रश्मी ठाकरे यांनी नगरसेवकांशी संवाद साधताना सांगितले. त्यानंतर चहापान उरकून काही नगरसेवक ‘मातोश्री’वरुन आपापल्या प्रभागांमध्ये परतले. तर काही नगरसेवक-नगरसेविकांना तेथे थांबण्यास सांगण्यात आले होते.

First Published on November 18, 2012 3:36 am

Web Title: uddhav thackeray advice to rest
टॅग Uddhav Thackeray
  1. No Comments.