उद्धव ठाकरे यांचा भाजपवर पलटवार
मुंबईतील उद्याने व मोकळ्या जागांचे खासगीकरण किंवा दत्तकविधानाचा निर्णय हा एकटय़ा शिवसेनेचा नाही. दिल्लीत ज्या प्रमाणे भाजपची सत्ता आहे तशी सत्ता शिवसेनेची महापालिकेत नसल्यामुळे भाजपसह अन्य पक्षांच्या सहमतीनेच याबाबतचा प्रस्ताव बहुमताने मंजूर करण्यात आला होता. ज्या पद्धतीने या विषयाचे राजकारण केले जातेय ते क्लेशदायक असल्याचे सांगून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर पटलटवार केला.
मोकळ्या मैदानांबाबतचे धोरण हे स्थायी समिती, सुधार समिती व महापालिका सभागृहांत मंजूर झाले तेव्हा भाजपनेही हा प्रस्ताव मंजूर केला होता. आता मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिल्यानंतर शिवसेनेला जबाबदार धरण्याचा जो उद्योग सुरू आहे तो चीड आणणारा आहे. केंद्राच्या भूसंपादन विधेयकासारखे हे मोकळ्या मैदानाचे धोरण नाही असे उद्धव यांनी सांगितले. जोगेश्वरी पूर्व येथील संजय गांधी नगर आणि अंधेरी पूर्व येथील पंप हाऊस या दोन्ही भुयारी मार्गाच्या रुंदीकरणाचे भूमिपूजन उद्धव यांच्या हस्ते करण्यात आले.
गरीब शेतकऱ्यांची जमीन घेऊन ती उद्योगपतींच्या घशात घालण्याच्या भूसंपादन विधेयकाला शिवसेनेने आपल्या पद्धतीने झटका दिला होता. मुंबई महापालिकेत दिल्लीसारखी आमची एक हाती सत्ता नाही. त्यामुळे मोकळ्या मैदानाचे धोरण मंजूर करताना भाजपनेही साथ दिली होती.
– उद्धव ठाकरे