News Flash

..अन्यथा स्वबळाची भाजपची तयारी!

मुंबईत निम्म्या जागा हव्यातच

मुंबईत निम्म्या जागा हव्यातच

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेशी युती करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अनुकूल असले तरी किमान निम्म्या जागा व सन्माननीय तडजोड होणार असेल, तरच युती होईल, अन्यथा स्वबळावर लढू, असे भाजपने ठरविले आहे. शिवसेनेकडून युतीसाठी कोणताही औपचारिक प्रस्ताव आल्यास त्यावर विचार करून योग्य निर्णय घेतला जाईल, असे भाजपमधील उच्चपदस्थ सूत्रांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. भाजपला ९० जागा देणारे ते कोण? असा सवाल करीत स्वबळावर लढून महापालिका काबीज करण्याची भाजपची तयारी असल्याचे भाजप नेत्यांनी स्पष्ट केले.

विधानसभेच्या निवडणुकीत युती तुटल्याने महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना व भाजप स्वबळावर लढण्याची तयारी करीत आहेत. भाजपला स्वबळावर सत्ता मिळविणे अवघड असल्याने व राज्यातील सरकारच्या स्थिरतेसाठी मुख्यमंत्री फडणवीस हे युतीसाठी अनुकूल आहेत. पण शिवसेनेने ९० जागा दिल्यास मिळेल ते स्वीकारून भाजप कदापिही तडजोड करणार नाही. त्याऐवजी स्वबळावर लढणे पसंत करेल. उलट शिवसेनेलाच स्वबळावर सत्ता येण्याची खात्री नसल्याने भाजपशी युती करण्यास ते आतुर आहेत, असे उच्चपदस्थ नेत्यांनी सांगितले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची पोलिसांना होत असलेल्या मारहाणीच्या घटनांबाबत भेट घेतली असली तरी त्यात युतीची कोणतीही चर्चा झाली नाही, असे भाजप नेत्यांनी स्पष्ट केले.

शहा-उद्धव ठाकरे भेट नाही

भाजप अध्यक्ष अमित शहा हे लालबागचा राजा, गिरगावचा राजा या गणपतींचे दर्शन घेण्यासाठी मुंबईत आले होते. पण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटण्यात शहा यांनी अजिबात रस दाखविला नाही. ठाकरे हे मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटण्यासाठी सकाळी १० वाजता ‘वर्षां’ बंगल्यावर गेले होते. तर शहा हे दुपारी सह्य़ाद्री अतिथिगृहावर होते. शहा हे मुंबई अध्यक्ष अ‍ॅड्. आशीष शेलार यांच्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी वांद्रे येथे गेले होते. पण ते ठाकरे यांच्या मातोश्रीकडे फिरकलेच नाहीत. शहा यांनी अनेक भाजप मंत्री, खासदार व अन्य नेत्यांशी चर्चा केली. शिवसेनेने जीएसटी विधेयकावर केंद्र सरकारला पाठिंबा दिला. ज्येष्ठ भाजप नेते लालकृष्ण अडवाणी, राजनाथसिंह हे मुंबईत आले की शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेत असत. पण उद्धव ठाकरे व शिवसेना नेत्यांकडून होणारी टीका आणि भूमिका यामुळे शहा हे संतापलेले असल्याने त्यांनी ठाकरे यांना भेटणे टाळले. त्यातूनच शिवसेनेशी युती करण्यास भाजप किती उत्सुक आहे, याचा अंदाज येतो, असे सूत्रांनी स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2016 2:45 am

Web Title: uddhav thackeray amit shah bmc elections
Next Stories
1 ‘प्रकल्पांकडे लक्ष द्या!’
2 हल्लेखोरांना किंमत चुकवावी लागेल
3 कोण चुकते?
Just Now!
X