शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह अन्य नेते आणि महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्यात दुष्काळाच्या मुद्दय़ावरुन जोरदार खणाखणी सुरु आहे. ‘मी शेतकऱ्याचा मुलगा आहे,’ असे सुनावत  ‘भुईमूग जमिनीवर येते की खाली, हे माहीत नसणाऱ्यांनी मला शिकविण्याचा प्रयत्न करु नये’, असा टोला महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी ठाकरे यांना अप्रत्यक्षपणे मारला आहे. शेतकऱ्यांच्याबाबत मी केलेल्या वक्तव्याचा विपर्यास केला गेल्याची सारवासारव खडसे यांनी केली. शेतकऱ्यांकडे मोबाईलचे बिल भरण्यासाठी पैसे आहेत आणि वीजेचे बिल का भरत नाहीत, अशा आशयाचे वक्तव्य केल्याने खडसे यांच्याविरोधात गदारोळ उठला आहे. ठाकरे यांनी खडसे यांच्या विधानावर जोरदार टीका केल्याने खडसे यांनीही त्याला मंगळवारी प्रत्युत्तर दिले. मी काय बोललो, हे ठाकरे यांनी नीट समजूनच घेतले नाही. काही शेतकरी मोबाईलचे बिल भरतात. त्यांनी वीजेच्या बिलाचे मुद्दल जरी भरले, तरी थकलेले बिल भरण्यासाठी हप्ते बांधून देता येतील. पण त्यांनी काहीतरी रक्कम भरावी, अशी अपेक्षा आपण व्यक्त केली, असे खडसे यांनी सांगितले.
मी शेतात घाम गाळला आहे व माझे घरही शेतात आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न मला माहीत आहेत, त्यामुळे कोणी शिकवू नये, असे खडसे यांनी स्पष्ट केले.