पदभार स्वीकारताच मुख्यमंत्री ठाकरे यांचा निर्णय

मुंबई : राज्य सरकारचा कोणत्याही विकासकामांना विरोध नाही. मात्र, वैभव गमावून विकासकामे केली जाणार नाहीत. दिलेला शब्द पाळणे, हे आपले तत्त्व आहे, असे स्पष्ट करत, ‘आरे’मधील मेट्रो कारशेडच्या वादग्रस्त कामाला स्थगिती दिल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी केली.

मेट्रो कारशेडच्या कामाचा संपूर्ण आढावा घेऊ न त्याबाबतचा पुढील निर्णय घेतला जाईल. मात्र तोवर मेट्रोच्या कामाला स्थगिती नाही, असेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, सरकारचा हा निर्णय दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव सरकारच्या या निर्णयावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.

मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर ठाकरे यांनी मंत्रालयातील पत्रकार कक्षात पत्रकारांशी संवाद साधला.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच मेट्रो कारशेडसाठी आरेतील २६४६ झाडे तोडण्यावरून शिवसेना-भाजपमध्ये चांगलीच जुंपली होती. झाडे तोडण्यास पर्यावरणप्रेमींनी विरोध केल्यानंतर आदित्य ठाकरे यांनीही आरेमध्ये कारशेड नको, अशी भूमिका घेत या प्रकल्पाविरोधात दंड थोपटले होते. त्यावर, कारशेडसाठी दुसरा पर्याय नसल्याने आरेशिवाय कोठेही कारशेड होणार नाही अशी भूमिका राज्य सरकार आणि ‘मुंबई मेट्रो रेल कार्पोरेशन’ने घेतल्यानंतर हे प्रकरण प्रथम उच्च न्यायालय आणि नंतर सर्वोच्च न्यायालयात गेले. दोन्ही न्यायालयांनी सरकारची भूमिका मान्य करीत मेट्रो कारशेडसाठी आरेतील झाडे सोडण्यास परवानगी दिली होती. मात्र त्यानंतरही आरेमध्ये कारशेड होऊ देणार नाही, असे आश्वासन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निडणुकीच्या प्रचारादरम्यान दिले होते.

ठाकरे यांनी गुरुवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर लगेच पर्यावरणप्रेमींनी निदर्शने करीत आरे वाचविण्याबाबत दिलेल्या आश्वासनाची ठाकरे यांना आठवण करून दिली. त्यामुळे आरेबाबत मुख्यमंत्री काय भूमिका घेतात याकडे सर्वाचे लक्ष लागले होते. शुक्रवारी मुख्यमंत्रिपदी विराजमान होताच लगेचच ठाकरे यांनी आरे कारशेडच्या कामाला स्थगिती दिली. ‘रातोरात झाडांची कत्तल मंजूर नाही. कोणत्याही विकासाच्या कामाला वा मेट्रोच्या कामालाही स्थगिती नाही. केवळ मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती दिली आहे. तेथील पानही तोडता येणार नाही. त्या कामाचा आढावा घेतला जाईल. त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल’, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्पष्ट केले.

यावेळी आमदार आदित्य ठाकरे, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह, मंत्रालय आणि विधिमंडळ पत्रकार संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे आदी उपस्थित होते.

मुंबईकरांचीच हानी- फडणवीस

आरेमधील मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती देण्याच्या सरकारच्या निर्णयावर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या निकालानंतरही मेट्रो कार शेडच्या कामाला स्थगिती देणे दुर्दैवी असून मुंबईतील पायाभूत सुविधा प्रकल्पांबाबत राज्य सरकार गंभीर नाही, हेच यातून दिसून येते. अशा निर्णयामुळे शेवटी हानी सर्वसामान्य मुंबईकरांचीच होईल, अशी टीका फडणवीस यांनी केली. या प्रकल्पासाठी जपानच्या ‘जायका’ने अत्यल्प व्याजदराने सुमारे १५ हजार कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. अशा प्रकारच्या निर्णयांमुळे पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये गुंतवणुकीसाठी गुंतवणूकदार पुढे येणार नाहीत. शिवाय, १५ वर्षांत आधीच विलंब झालेले प्रकल्प आणखी रेंगाळतील, अशी भीतीही फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.