01 March 2021

News Flash

निवडणूक आयुक्तांवर गुन्हा नोंदवा – उद्धव ठाकरे

शिवसेनेच्या उमेदवाराला प्रचंड मते मिळाल्याबद्दल शिवसैनिकांचे कौतुक आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

पुढील निवडणुका स्वतंत्र लढण्याचा विचार

मुंबई : इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमधील बिघाड पाहता निवडणूक यंत्रणाच भ्रष्ट झाल्याचे दिसत असून याबद्दल मुख्य निवडणूक आयुक्तांवर गुन्हा दाखल करायला हवा, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी केली. त्याचबरोबर यापुढील सर्वच निवडणुका स्वतंत्र लढविण्याचा विचारही त्यांनी जाहीर केला.

पालघर पोटनिवडणुकीत अचानक एक लाख मते वाढली. आयोगाने दुसऱ्या दिवशी ते जाहीर केले. या वाढलेल्या एक लाख मतांचे पुरावे द्यावेत, अशी मागणीही त्यांनी केली. याप्रकरणी गरज पडल्यास न्यायालयात जाऊ, असेही ते म्हणाले. मुख्य निवडणूक आयुक्तांची नेमणूक होण्याऐवजी  त्यांचीही निवडणूक घ्यावी, असा टोलाही त्यांनी लगावला.

या पोटनिवडणुकीत इव्हीएमबद्दल खूप तक्रारी आल्या. निवडणूक आयोग ही तटस्थ यंत्रणा आहे की बुजगावणे, पूर्वी निवडणुकीतील एका प्रकरणावरून निवडणूक आयोगाने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मतदानाचा अधिकार काढून घेतला होता. निवडणूक यंत्रणेवर आयोगाचे नियंत्रण आहे की नाही, अनेक मतदारांची नावेच नसतात. मतदान यंत्रे बंद पडतात. मग आता निवडणूक यंत्रणा भ्रष्ट असल्याबद्दल मुख्य निवडणूक आयुक्तांवर खटला दाखल केला पाहिजे, असे ते म्हणाले.

ही निवडणूक पद्धत अशीच राहिली तर लोकांचा लोकशाहीवरील विश्वास उडेल. लोकांचा उद्रेक होईल, असा इशारा ठाकरे यांनी दिला.

पालघरमध्ये पाच-सहा पक्षांत मतविभागणी झाल्यामुळे भाजपच्या उमेदवाराचा विजय झाला. आठ लाखांपैकी सहा लाख मते भाजपच्या विरोधात गेली आहेत. शिवसेनेच्या उमेदवाराला प्रचंड मते मिळाल्याबद्दल शिवसैनिकांचे कौतुक आहे. त्यांनी घराघरात धनुष्यबाण पोहोचवला, अशा शब्दांत सेनेच्या कामगिरीबद्दल ठाकरे यांनी समाधान व्यक्त केले.

पालघरमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रचार केला. पण उत्तर प्रदेशातील कैरानामधील पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव करत तेथील जनतेने योगींची मस्ती उतरवली. योगींनी पालघरमधील प्रचारावेळी शिवरायांच्या प्रतिमेला अभिवादन करताना पादत्राणे काढली नाहीत. हा शिवरायांचा अवमान होता. तो भाजपला चालतो असा संशय येतो, अशी टीकाही ठाकरे यांनी केली.

इव्हीएम बिघाडाची मुख्यमंत्र्यांना चिंता

पालघर व भंडारा-गोंदियाच्या पोटनिवडणुकीत इव्हीएम बंद पडण्याच्या अनेक तक्रारी आल्या असून निवडणूक आयोगाने त्याची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. मतदान यंत्र बंद पडण्याचा मोठा फटका भाजपला बसला आहे. कारण भाजपचा मतदार असलेला सुशिक्षित वर्ग सकाळी मतदानाला येतो. पण मतदान यंत्र बंद पडल्यामुळे तो माघारी जातो आणि नंतर काही परतत नाही, असेही फडणवीस म्हणाले. भाजप काही ही यंत्रे आपल्या घरात तयार करत नाही, अशा शब्दांत इव्हीएममध्ये भाजप घोळ घालत असल्याच्या आरोपांचेही मुख्यमंत्र्यांनी खंडन केले. तसेच घोळ घालता येत असता तर पालघरमध्ये जिंकलो तसे भंडारामध्येही जिंकलो असतो. कर्नाटकात १०४ वर थांबलो नसतो, असेही ते म्हणाले.

आमचा पराभव मला मान्यच नाही. कारण या निवडणुकीत साम, दाम, दंड, भेदाची भाषा केली गेली होती, हे लक्षात ठेवले पाहिजे.

– उद्धव ठाकरे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2018 3:22 am

Web Title: uddhav thackeray attack election commision after palghar bypoll lost
Next Stories
1 आदिवासी भागातील पाठिंब्यामुळे भाजपच्या विजयाचा मार्ग मोकळा
2 राष्ट्रवादीला दिलासा
3 काँग्रेसला फटका
Just Now!
X