उद्धव ठाकरेंची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका
देशात प्रचंड अस्थिरता असून सरकारकडे आशेने बघणाऱ्यांना प्रत्येक वळणावर धोका दिसत आहे, असे प्रतिपादन करीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.
भारतीय कामगार सेनेच्या मेळाव्यात बोलताना ठाकरे म्हणाले, पठाणकोटच्या हवाई तळावर हल्ला करणाऱ्या पाकिस्तानच्याच तपास अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाला केंद्र सरकारने आमंत्रण दिले. आता तेच उच्चस्तरीय शिष्टमंडळ भारताकडे पुरावे नाहीत आणि त्यांचाच बनाव असल्याचा कांगावा करीत आहे.
सरकारला कामगारांशी देणेघेणे नाही. जनता घामाचा पैसे बँकेत जमा करते आणि तोच पैसा घेऊन मल्ल्यासारखे उद्योगपती परदेशी पसार होतात. देशातील शेतकरी, कामगार, सीमेवर लढणारे जवान, सर्वाचीच अवस्था बिकट आहे. ब्रिटनमध्ये तीन मोठे उद्योग बंद होऊन ४० हजार कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. हे समजल्यावर पत्नी व मुलांसह परदेशी गेलेले पंतप्रधान कॅमेरुन मायदेशी गेले. आपल्या देशात असे होईल का, असा सवाल करीत ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांना लक्ष्य केले आहे. जनतेच्या घामाचा पैसा कर भरण्यात निघून जातो. ज्यांना मोठय़ा अपेक्षेने निवडून दिले, तेच जनतेवर कर लादत आहेत. गरज नाही, अशा बाबींना करमाफी आणि लोकांच्या गरजेच्या वस्तूंवर कर लादले जात आहेत, असे ठाकरे म्हणाले.

वाट कसली बघता?
भारतमाता की जय म्हणणार नाही, त्यांना देशात राहण्याचा अधिकार नाही, अशी वक्तव्ये नुसती केली जात आहेत. मग वाट कसली बघता, त्यांची गचांडी धरून पाकिस्तान व बांगलादेशात फेकून द्या, असा टोला ठाकरे यांनी लगावला.