युतीचे जागावाटप निम्म्या जागांच्या समीकरणात होणार नाही, या भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केल्यानंतर जागावाटपाचा अधिकार मी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अमित शहा यांचाच असल्याचे ठासून सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपण चंद्रकांत पाटील यांच्या विधानाला किंमत देत नसल्याचे सूचित केले.

मित्र पक्षांना जागा सोडल्यावर उरलेल्या जागा निम्म्या वाटून घेण्याच्या युतीच्या समीकरणावर चंद्रकांत पाटील यांनी नागपूरमध्ये विधान केले. जुने समीकरण आता योग्य ठरणार नाही व त्याची जाणीव शिवसेनेलाही असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले होते. बहुजन विकास आघाडीचे बोईसरचे आमदार विलास तरे यांनी रविवारी शिवसेनेत प्रवेश केला.

यावेळी पत्रकारांनी उद्धव ठाकरे यांना चंद्रकात पाटील यांच्या विधानाबाबत विचारले असता, जागावाटपाचा अधिकार मी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे गृहमंत्री व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचाच असल्याचे ठाकरे यांनी ठासून सांगितले. चंद्रकांत पाटील यांचा नामोल्लेखही ठाकरे यांनी टाळला. त्यातून युतीच्या चर्चेत आपण मुख्यमंत्री व अमित शहा यांच्याशिवाय कोणालाही गृहीत धरत नाही. चंद्रकांतदादा यांच्या विधानाला फारशी किंमत देत नाही, असेच उद्धव ठाकरे यांनी सूचित केले.