शिक्षण मंत्र्यांबरोबर बैठक, निर्णयांचा धडाका

मुंबई : राज्यातील शाळांमधील वीजपुरवठा आणि विजेवरील खर्चाचा प्रश्न सोडवण्यासाठी महाऊर्जा विभागाच्या माध्यमातून सौरऊर्जा उपकरणे बसवण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी घेतल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही शाळांमध्ये व्हर्च्युअल   क्लासरूम सुरू करण्याची घोषणा मंगळवारी केली.

शालेय शिक्षण विभागाची आढावा बैठक पवार यांनी सोमवारी आणि ठाकरे यांनी मंगळवारी घेतली. शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांच्या उपस्थितीत या बैठका झाल्या.

शाळाना अखंड वीजपुरवठा व्हावा यासाठी महाऊर्जा विभागाच्या माध्यमातून सौरऊर्जा उपकरणे बसविण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्हा परिषद शाळांच्या दुरुस्तीसाठी ग्रामविकास विभागामार्फत जिल्हा परिषदांना देण्यात येणाऱ्या निधीपैकी २० टक्के निधी शाळांना देण्यात येईल.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी सर्व शाळांमध्ये ‘व्हर्च्युअल   क्लासरूम’ उभारण्याबाबतचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे आदेश दिले.  शालेय उपक्रमांत उद्योजकांची मदत घेण्याबाबत नियोजन करण्यात यावे. विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा पुरवाव्यात, असेही ते म्हणाले.

शाळांच्या अनुदानात वाढ 

शाळांच्या अनुदानासाठीच्या तरतुदीत ५० कोटींवरून ११४ कोटी रुपयांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय शासनाने सोमवारी घेतला. मुंबई, पुणे, नागपूर, पिंपरी-चिंचवड तसेच नवी मुंबई  या महापालिकांच्या शाळांचा विकास करण्याची घोषणाही उपमुख्यमंत्र्यांनी केली.